मधुबनी – भाजप केंद्रातील सत्तेत ४०-५० वर्षे राहील असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वारंवार करायचे. त्या दाव्यामागील कारण आता समजले. मतचोरीच्या आधारावर ते तसे म्हणायचे, असा शाब्दिक हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू आहे. त्या यात्रेवेळी मधुबनीमध्ये झालेल्या सभेत राहुल बोलत होते. भाजपचे नेते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतचोरीमध्ये गुंतले आहेत. ते सत्र गुजरातमधून सुरू झाले, असा आरोप त्यांनी केला. भाजप मतचोरी करून एकापाठोपाठ एक राज्यांत विजय मिळवतो. त्याविषयी पुरावा नसल्याने याआधी मी बोलत नव्हतो. मात्र, आता पुरावा हाती आला. संपूर्ण देशासमोर सत्य उघड झाले. मताधिकाराचे आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी जनतेने पुढे यावे. जनतेने मताधिकार गमावल्यास राज्यघटनेचे रक्षण करता येऊ शकणार नाही. मतांशिवाय कुठला अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे जनतेसाठी आणि विशेषत: गरिबांसाठी मताधिकाराला खूप महत्व आहे. भाजपकडून होणाऱ्या मतचोरीचा मुद्दा मी सातत्याने मांडत आहे. मात्र, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा एक शब्दही बोलले नाहीत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. यात्रेत प्रियंका गांधी सहभागी राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या यात्रेत त्यांच्या खासदार भगिनी प्रियंका गांधी सहभागी झाल्या. त्यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे तो पक्ष देशभरात मतचोरीमध्ये गुंतला आहे. मतचोरी रोखण्यासाठी जनतेने सतर्क रहावे, असे आवाहन प्रियंका यांनी केले.