Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

Volodymyr Zelenskyy – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी आज अमेरिका आणि युरोपातल्या नेत्यांची रोम येथे भेट घेतली. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा होणार आहे. त्या चर्चेवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झेलेन्स्की यांच्याकडून रोमधील चर्चेत केला गेला. नवीन पोप लिओ १४ वे यांच्या शपथविधीच्या सोहळ्यानिमित्त हे नेते रोम येथे जमले होते.
झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.वान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली. तर जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेड्रीक मर्झ यांनी देखील झेलेन्स्की आणि रुबिओ यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. फ्रान्स आणि ब्रिटनच्या नेत्यांच्या मताशी आपण सहमत असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे मर्झ यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी युरोप आणि अमेरिकेने एकत्रितपणे भूमिका घ्यायला हवी, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. समोरासमोर चर्चेला पुतीन उपस्थित न राहिल्यामुळे झेलेन्स्की संतप्त झाले आहेत. इस्तंबुलमधील चर्चा अवघ्या दोन तासातच गुंडाळण्यात आली होती. आता रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुत्सदेगिरी आणि उच्चस्तरिय भेटीगाठींचे प्रमाण वाढले आहे.
आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धकैद्यांच्या आदलाबदलीचे नियोजन केले जाते आहे. दोन्ही देशांनी एक हजार युद्धकैद्यांची सुटका करण्याचे मान्य केले असून पुढील आठवड्यात याची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे रशियाने एकूण २७३ स्फोटक ड्रोन आणि डिकॉय सोडले. त्यापैकी ८८ ड्रोन अडवण्यात आले आणि आणखी १२८ हरवले असल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने रविवारी सांगितले.





