Vladimir Putin : इस्रायल-इराण तणाव कमी करण्यासाठी मदत करणार; व्लादिमीर पुतीन यांनी इराणला दिली ग्वाही

मॉस्को : इस्रायल-इराण तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणला दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी आज मॉस्कोमध्ये इराणच्या प्रमुख मित्रांपैकी एक देश असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे पत्र ते पुतीन यांना देण्यासाठी मॉस्कोला गेले आहेत. अराघची यांच्याबरोबरच्या भेटीदरम्यान पुतीन यांनी इस्रायल-इराणच्या संघर्षासंदर्भातल्या रशियाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेने इराणच्या अणू प्रकल्पांवर आणि तेहरानवर केलेल्या हल्ल्यांचा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रात रशियाकडून जी भूमिका मांडली जाते आहे, त्याची इराणला पुर्ण कल्पना असल्याचेही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.इराणवरील अमेरिकेचा हल्ला हा निव्वळ विनाकारण केलेले आक्रमण होते. या हल्ल्याला कोणताही आधार नाही आणि त्याचे कोणतेही समर्थन देखील केले जाऊ शकत नाही. इराणच्या अणू प्रकल्पांवर अमेरिकेने केलेले हल्ले हे केवळ अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशांवरून करण्यात आल्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे.
इराणशी आमचे दीर्घकालीन, चांगले आणि विश्वासार्ह संबंध आहेत. आमच्याकडून, आम्ही इराणी लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे पुतीन यांनी अराघची यांना सांगितले. रशिया आणि इराणने धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे, परंतु कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास दुसऱ्या देशाच्या बाजूने लष्करी मदतीची तरतूद त्यात नाही. तथापि, या कराराअंतर्गत आक्रमकाची बाजू न घेण्याची आणि परिस्थितीतील तणाव कमी करण्यासाठी तातडीने राजकीय सल्लामसलत करण्याची जबाबदारी इराण आणि रशियावर आहे.





