Vladimir Putin : पुतीन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार

मॉस्को – रशियाच्या अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या पाठीराख्यांनी आज औपचारिकपणे त्यांच्या अध्यक्षीय उमेदवारीची घोषणा केली.
रशियाच्या निवडणूक कायद्यानुसार अध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवाराला किमान ५०० समर्थकांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. याशिवाय अपक्ष उमेदवाराला किमान ३ लाख जणांच्या स्वाक्षरीने पाठिंब्यांचे पत्र सादर करणे आवश्यक आहे. पुतीन यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देणाऱ्या गटामध्ये सत्तारुढ युनायटेड रशिया पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
याशिवाय रशियामधील बडे अभिनेते, गायक, खेळाडू आणि सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या नावाजलेल्या व्यक्तींनीही पुतीन यांना पठिंबा दिला आहे. ब्लादिमिर पुतीन यांना अध्यक्ष म्हणून पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन पीपल फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष मिखाईल कुत्झनेत्सोव यांनी केले होते.
पुतीन यांनीच स्वतः २०११ मध्ये पीपल्स फ्रंट या राजकीय आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीच्यावतीनेच पुतीन यांच्या पाठिंब्यासाठी मोठे अभियान सध्या राबवले जाते आहे. कुत्झनेत्सोव यांच्या आवाहनानंतर मिळालेल्या पाठिंब्याच्या आधारे या गटाने पुतीन यांना एकमताने आपल्या आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
रशियाची संसद ड्युमाचा सदस्य नसलेल्या पक्षाकडून उमेदवार घोषित होतो किंवा प्रादेशिक विधानसभांना ४० किंवा अधिक प्रदेशांमधून किमान एक लाख स्वाक्षऱ्यांचे पत्र सादर करावे लागते. अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला ४० किंवा अधिक प्रदेशांमधून ३ लाख स्वाक्षऱ्या गोळा कराव्या लागतात.
पुतीन यांनी या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. त्यांनी याच निकषाच्या आधारे २०१८ मध्येही निवडणूक लढवली होती. २०१२ मध्ये त्यांनी क्रेमलिन युनायटेड रशियन पार्टीची उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे तेंव्हा त्यांना स्वाक्षऱ्या मिळवाव्या लागल्या नव्हत्या. यंदा ड्युमाच्या ४५० जागांपैकी २७ जागा असलेल्या ए जस्ट रशिया पक्षाचा पुतीन यांना पाठिंबा आहे. मात्र या पक्षाचे नेते रर्जी मिरोनोव्ह यांनी पुतीन हे अपक्ष उमेदवार असतील, असे म्हटले आहे.
रशियातील अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी १७ मार्चला होणार आहे. या निवडणुकीद्वारे पुतीन पाचव्यांदा रशियाचे अध्यक्ष बनण्याच्या प्रयत्नात आहेत. रशियाच्या राज्य घटनेनुसार अध्यक्षपदाची त्यांची सध्याची टर्म संपल्यानंतरही आणखीन दोन वेळा ते अध्यक्ष होऊ शकतील. त्यामुळे किमान २०३८ सालापर्यंत ते रशियाचे अध्यक्ष राहू शकतील. निवडणुकीमध्ये त्यांना आव्हान देणारे बहुतेक नेते एकतर तुरुंगात आहेत. तर स्वतंत्र प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुतीन यांची निवड सुकर झाली आहे.





