Vladimir Putin : ब्लादिमिर पुतीन यांनी मागितली अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांची माफी

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी आज अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांची या आठवड्यात अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानाच्या अपघाताबद्दल माफी मागितली. अझरबैजानचे प्रवासी विमान कझाकस्तानमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेमध्ये ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर २९ जण बचावले होते.
हे विमान बाकू कडून चेचन्याची राजधानी ग्रोझनीकडे जात असताना रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्यावर मारा केला होता. युक्रेनकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्याला रोखण्यासाठी ही प्रणाली कार्यरत होती. या प्रणालीतून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्रामुळे हे विमान कोसळले, असे पुतीन यांनी मान्य केले. क्रेमलिनकडून या संदर्भातील निवेदन परसिद्धीस देण्यात आले असून त्यात पुतीन यांनी अझरबैजानची माफी मागितल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
ही एक दुःखद दुर्घटना होती, असे पुतीन आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे विमान ग्रोझनी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. या विमानतळावर युक्रेनकडून हल्ले होत होते. विमान ग्रोझनी विमानतळावर उतरण्यासाठी घिरट्या घालत होते. त्या वेळी, ग्रोझनी, मोझडोक आणि व्लादिकाव्काझवर युक्रेनच्या ड्रोनकडून हल्ले केले जात होते आणि रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले परतवून लावले, या हल्ल्यांना रोखण्यासाठी रशियाच्या हवाई हद्दीत हवाई संरक्षण प्रणालीकडून क्षेपणास्त्रे डागली जात होती. यामुळेच हे विमान कोसळले. असे त्यात म्हटले आहे.





