Vitthalrao Langhe – राज्य सरकार जनतेच्या कल्याणसाठी मोठे लोकाभिमुख निर्णय घेत असताना त्याचा फायदाही शेवटच्या घटकांपर्यंत होणे गरजेचे आहे. शासन दरबारी आलेल्या सर्वसामान्य माणसाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. आपण आता येथून पुढे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करू आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र येथून थेट उचलबांगडी करू, असा इशारा आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिला. नेवासे फाटा येथील जी.के.मंगल कार्यालयात आयोजित शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार लंघे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, तालुका कृषी विभागाचे धनंजय हिरवे, भूमी अभिलेखचे संदीप गोसावी, भानसहिवरे मंडलधिकारी सरिता मुंढे, भाजपाचे नेते अंकुश काळे, माजी उपसभापती किशोर जोजार, प्रताप चिंधे, दादा निपुंगे, धरणग्रस्त कृती समितीचे दिगंबर आवारे आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी म्हणाले की,कामात दिरंगाई आणि चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची खैर करणार नसल्याचे सांगून संबंधितांच्या चुकीला माफी देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी जनतेची कामे वेळेत करून मार्गी लावण्याचे आदेश दिले. तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली तर प्रास्ताविक मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी केले.शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडलाधिकारी सरिता मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भानसहिवरा मंडळातील मुकिंदपूरचे तलाठी आकाश जोशी, श्वेता काळे, निलेश साळुंखे, सोमनाथ गलांडे, अशोक गाडेकर, रमेश रिंधे यांच्यासह महसूल मंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले होते.