पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह; महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे प्रतिपादन

हडपसर – पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. येथील कलाकारांच्या कला- गुणांना वाव देण्यासाठी शहराच्या पूर्व भागात अतिशय सुरेख असे नाट्यगृह महापालिकेने उभारले आहे. सांस्कृतिक व सामाजिक कार्यास उपयुक्त ठरणारे हे विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे आहे, असे प्रतिपादन प्रशासक तथा पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
पुणे महापालिकेच्या स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाचे लोकार्पण कार्यक्रमात डॉ. भोसले बोलत होते. प्रकृती अस्वस्थामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे श्रीमती लीलावती विठ्ठल तुपे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, आमदार चेतन तुपे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर वैशाली बनकर, स्वर्गीय विठ्ठल तुपे यांच्या भगिनी बेबीताई टाकळकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह माजी नगरसेवक, माजी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच तसेच सर्वपक्षकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक कलाकार उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, स्वर्गीय विठ्ठल तुपे हे निष्कलंक व चारित्र्यवान नेतृत्व पुणे शहर व हडपसरला लाभले, त्यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मगरपट्टा सिटी व अमनोरा सिटी या संकल्पना मांडल्या व उभारणीसाठी प्रयत्न केले. कलापथकाच्या माध्यमातून आपल्या कलेची आवड जोपासणारे स्वर्गीय विठ्ठल तुपे यांनी ज्येष्ठ अभिनेते राम नगरकर व निळू फुले यांच्या समवेत काही चित्रपटात कामही केले.
याशिवाय नगरसेवक ते खासदार, चेअरमन, संस्थांचे संस्थापक आणि सदस्य अशा पदांवरही काम केले. आज त्यांच्या जयंती निमित्त या नाट्यगृह लोकार्पण होत आहे, असे सांगताना आमदार तुपे हे अतिशय भावूक झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी आभार मानले.
“हडपसर माळवाडी येथील सर्वे नंबर १६५ या दोन एकर जागेवर नाट्यगृह उभारण्याची कल्पना मी नगरसेवक असताना घेऊन आलो. ही अतिशय सुंदर आणि आकर्षक वास्तू उभी राहिली. समस्त हडपसर वासियांच्या आग्रहास्तव या वास्तूला विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हे नाव देण्यात आले. स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांची जयंतीदिनी या वास्तूचे आज तिचे लोकार्पण होत असताना मला आणि समस्त तुपे कुटुंबीयांना आनंद आहे. ” – चेतन तुपे पाटील, आमदार ,हडपसर विधानसभा





