Pnadharpur News : आजपासून सावळा विठ्ठल भेटीला.! नित्यपूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले

Vitthal Rukmini Mandir | Pnadharpur – जीर्णोद्धाराच्या कामासाठी गेल्या ७५ दिवसांपासून सामान्य भाविकांसाठी बंद असलेले श्री विठ्ठल मंदिराचे द्वार रविवारपासून ( २ जून ) खुले झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्यपूजा झाल्यानंतर भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे.
पदस्पर्श दर्शन रांग पूर्वीप्रमाणेच दर्शन मंडपातून येईल. मात्र, मुखदर्शन रांग काही दिवस मंदिराच्या उत्तर बाजूने आत घेतली जाईल आणि सुमारे ६० फूट अंतरावरून सोळखांबी मंडपाच्या बाहेरून काढण्यात येत आहे, ही व्यवस्था सुमारे महिनाभर असेल,
नंतर मात्र मुखदर्शन रांग पूर्वीप्रमाणे सोळखांबी मंडपातून घेतली जाईल. दरम्यान, सध्या दर्शनासाठी करण्यात आलेली व्यवस्था ही काही दिवसांसाठी असून आषाढी यात्रेपूर्वी ही व्यवस्था पूर्ववत केली जाणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संपूर्ण मंदिर संकुलाचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाच्या ७३ कोटी रुपयांच्या निधीतून हे काम होत असून यातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा होता तो श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीचे व मजबुतीकरणाचे काम अतिशय क्लिष्ट, नाजूक असलेल्या या कामानिमित्त १५ मार्चपासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते.
केवळ दररोज सकाळी ५ तास मुखदर्शन सुरू होते. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने सुमारे अडीच वर्षे श्री विठ्ठल मंदिर कुलूप बंद होते, त्यानंतर प्रथमच ७५ दिवस एवढ्या दीर्घकाळ विठ्ठल आणि त्याच्या भाविकांची ताटातूट झालेली होती. मात्र हा दुरावा आता दूर झाला आहे.
गाभाऱ्यात व सोळखांबी मंडपात फुलांची आरास
सुमारे अडीच महिने देवाचे नित्योपचार सुरू असले तरी फुलांची सजावट, विद्युत दिव्यांची रोषणाई बंद होती. मात्र विठ्ठल भक्तांच्या भेटीसाठी पुन्हा येत असल्याने गाभाऱ्यात आणि सोळखांबी मंडपात फुलांची आरास करण्याची लगीन घाई बाजीराव पडसाळी परिसरात सुरू होती. गाभारा, सोळखांबी मंडप धुऊन चकाचक करण्यात आला होता. गरजेनुसार विद्युतीकरण करण्याचे, दर्शन व्यवस्था उभा करण्याची घाई मंदिरात सुरू होती.
श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे, चौखांबी, सोळखांबी मंडपाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सध्या केवळ गाभारा आणि सोळखांबी मंडपापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आषाढी यात्रेपूर्वी विठ्ठलाचा सभामंडप, बाजीराव पडसाळी, रुक्मिणी सभामंडप येथील काम पूर्ण होणार आहे.
-राजेंद्र शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी





