Pune : खंडपीठासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट

पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी पुणे बार असोसिएशनचा निर्णायक पाठपुरावा सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सोमवारी (दि.२८) भेट घेण्यात आली. त्यांनी खंडपीठाच्या मागणी संदर्भात सकारात्मकता दाखविली आहे. ‘पुणे येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पुणे बार असोसिएशनने केलेल्या मागणीचा योग्य प्रक्रियेचे पालन करून आणि गुणवत्तेच्या आधारे सकारात्मक विचार केला जाईल’ असे म्हटले आहे.
ही भेट अचानक व तातडीची होती. भेट घडवून आणण्यासाठी बार कौन्सिल अॉफ महाराष्ट्र् आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल कोंडे- देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली. न्यायमूर्ती अराधे यांनी चर्चा करण्यासाठी वेळ दिल्यामुळे, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी न्यायमूर्ती आराधे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. राजेद्र उमाप, ॲड. अहमद पठाण, ॲड. रविंद्र शिंदे, ॲड. समीर भुंडे, ॲड. सुरेखा भोसले, ॲड. पृथ्वीराज थोरात, ॲड. आकाश गलांडे, ॲड. मंगेश लेंडघर आवर्जून उपस्थित होते.





