जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक 2024 श्रीमती सुहास उर्फ सुहासिनी जोशी यांना जाहीर झाला आहे. श्रीमती सुहास जोशी यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
कसे आहे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराचे स्वरूप
यंदा दिले जाणारे हे 57वे भावे गौरव पदक आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.
विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याना हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेल्या 55 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जात आहे.
सुहास सुभाष जोशी यांच्याविषयी
सुहास सुभाष जोशी यांचा जन्म 12 जुलै 1947 रोजी झाला. सुहास जोशी या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. यांनी गेली अनेक वर्षे असंख्य मराठी नाटके, चित्रपट, हिंदी चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी टी व्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांना झी गौरव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेअर अशा अनेक संस्थातर्फे जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी 25 मराठी नाटके, अनेक हिंदी आणि मराठी दूरदर्शन मालिका, मराठी – हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारामध्ये नाट्य दर्पण, मराठी ग्रंथ संग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
आनंदी गोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृती चित्रे, अग्निपंख, इत्यादी. तसेच तू तिथे मी, आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई हे त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. अनेक मराठी हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेले आहे. याच बरोबर गेली काही वर्षे त्या लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्गाचे संचालन करीत आहेत.





