Pune Porsche Accident Case : अग्रवाल दाम्पत्य, मकानदारची रवानगी येरवडा कारागृहात…

पुणे – कल्याणीनगर येथील अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशपाक मकानदारला न्यायालयाने शुक्रवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी हा आदेश दिला. त्यामुळे अगरवाल दाम्पत्य आणि मकानदारचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे.
या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी अगरवाल दाम्पत्य आणि अशपाक मकानदार यांच्यामध्ये एक महत्त्वाची “बैठक’ झाली होती. ती नक्की कोठे झाली? , तिथे कोण उपस्थित होते? , तिथून ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला होता का? , याबाबत तपास करण्यासाठी आरोपी अशपाक मकानदार याला तीन दिवसांची कोठडी द्यावी, तर अगरवाल पती-पत्नीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी न्यायालयाकडे केली. तसेच सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी तपासातील प्रगती अधोरेखित केली.
एकट्याला पोलिस कोठडी कशी?
आरोपी मकानदार हा रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलिस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याकरिता डॉक्टरांना देण्यासाठी मकानदार याने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोरकडून जप्त करण्यात आले आहेत, परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला दिले ? याबाबत तो माहिती सांगत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
तर आरोपींला पुरेशी पोलिस कोठडी झाली असताना, तसेच अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली असताना, एकट्या मकानदारची पोलिस कोठडीत काय चौकशी करणार आहेत? ’ असा युक्तिवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अगरवाल दाम्पत्यासह मकानदारची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.





