Virat Kohli : ‘अपमानापासून ते सन्मानापर्यंत…’, विराटने सांगितली आस्ट्रेलियात मिळालेल्या प्रेम आणि द्वेषाची संपूर्ण कहाणी

Virat Kohli on Australia : भारतीय फलंदाज विराट कोहलीने सांगितले की, ऑस्ट्रेलियातील क्रिकेटमधील आक्रमक वातावरणाने त्यांच्या क्षमतेची कसोटी पाहिली. या आव्हानात्मक वातावरणात धैर्याने खेळण्याने त्याला मानसिकदृष्ट्या मजबूत क्रिकेटपटू बनण्यास मदत झाली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. कोहलीने 2011 मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या आक्रमक स्वागताला सामोरे जावे लागले. मात्र, हळूहळू ही आक्रमकता आदरात बदलल्याचे त्यांनी नमूद केले.
विराट कोहली काय म्हणाला?
पहिल्या वनडे सामन्यापूर्वी फॉक्स क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, “लहानपणी आम्ही पहाटे उठून ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने पाहायचो. तेव्हा मी स्वतःला त्या परिस्थितीत आणि या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना कल्पना करायचो. जर मी अशा परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकलो, तर एक क्रिकेटपटू म्हणून मला त्याचा अभिमान वाटेल. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग यांसारख्या महान खेळाडूंना खेळताना पाहणे माझ्यासाठी प्रेरणादायी होते.”
You know you’re doing something incredible when you gain the respect of Australian fans. 👏@imVkohli speaks on how playing down under brought the best out of him. 💪#AUSvIND 👉 1st ODI | LIVE NOW 👉 https://t.co/FkZ5L4CrRl pic.twitter.com/Lmlbzk0u2y
— Star Sports (@StarSportsIndia) October 19, 2025
तो पुढे म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघाने ज्या पद्धतीने क्रिकेट खेळले, त्यांचा सामना केला आणि सामन्यावर नियंत्रण ठेवले, त्याने मला इथे येऊन असेच काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. सुरुवातीला मला वाटले की, हे आक्रमक वातावरण टीव्हीवर पाहणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात त्याचा भाग होणे वेगळेच आहे. पण त्या सर्व अनुभवांबद्दल मी आभारी आहे, कारण त्यामुळे मी क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून अधिक चांगला झालो. तसेच अशा वातावरणात तुमची मानसिक ताकद आणि लवचिकतेची खरी कसोटी लागते. कारण एकदा का तुम्ही अशा कठीण परिस्थितीत खेळायला सुरुवात केली, तर तुम्ही प्रतिस्पर्धी आणि प्रेक्षकांना टाळू शकत नाही.”
केविन पीटरसनकडून मिळाली मदत –
विराट कोहलीने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन सोबतच्या संभाषणाचा उल्लेख केला. आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकत्र खेळताना पीटरसनने त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तयार होण्यास मदत केली. कोहली म्हणाला, “सुरुवातीला मला हे समजले नाही, पण केविन पीटरसनने मला सांगितले की, ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना वाटते की ते तुमच्यावर सतत नजर ठेवून आहेत, पण मनातून ते तुमच्या खेळाचे कौतुक करतात.”
तो पुढे म्हणाला, “त्यामुळे हे मनावर घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मैदानावर उतरून कठोर क्रिकेट खेळा. यामुळे तुम्हाला एक खेळाडू म्हणून किती प्रगती करत आहात आणि मानसिकदृष्ट्या कशासाठी तयार व्हायला हवे हे समजते. इथल्या प्रेक्षकांनी मला माझे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास प्रेरित केले. अशा परिस्थितीत तुम्हाला 120 टक्के देण्याशिवाय पर्याय नसतो. मी इथे माझे सर्वोत्तम देऊ शकणार नाही, अशी शक्यताच नव्हती. त्यामुळे एक क्रिकेटपटू म्हणून मी इथे खूप चांगला वेळ घालवला. मैदानाबाहेर इथल्या लोकांचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.”





