Virat Kohli : ‘बाजूला ये, तुला दाखवतो…’, IPL पदार्पणातच विराटने ‘या’ स्टार खेळाडूला दिली होती धमकी

Virat Recalls Hilarious Sledging Battle with Ishant in IPL 2008 Debut : २००८ मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीने इशांत शर्माला केलेल्या मजेशीर स्लेजिंगच्या आठवणीला उजाळा दिला. त्यावेळी आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना खेळला गेला होता. विराट कोहलीने सांगितले की, त्यावेळी इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला होता आणि तो खूप आत्मविश्वासू होता. त्याने नवीन हेअरस्टाईल देखील केली होती आणि तो स्वतःला एक मोठा स्टार मानत होता.
यावेळी इशांतने मैदानावर कोहलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण कोहलीने त्यालाही जोरदार प्रत्युत्तर दिले. कोहलीने कबूल केले की हे सर्व खेळाचा भाग होते आणि आज तो क्षण आठवून त्याला हसू येते. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये ही मजेदार थट्टामस्करी पाहायला मिळाली होती.
विराटने सांगितला एक मजेशीर किस्सा –
जिओ हॉटस्टारच्या ‘१८ कॉलिंग १८’ या शोमध्ये एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने २००८ च्या आयपीएल सामन्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला. त्याने सांगितले की त्या सामन्यात इशांत शर्मा त्याला स्लेजिंग करत होता. त्यावेळी इशांत ऑस्ट्रेलियाहून परतला होता, त्याने त्याचे केसही रंगवले होते आणि तो एक स्टार बनला होता. कोहली हसत म्हणाला, “मी इशांतला म्हणालो होते की बाजूला ये, मी तुला दाखवतो.” पण त्याने हे देखील कबूल केले की हे सर्व फक्त मस्करी होती आणि खेळाचा एक भाग होता.
हेही वाचा – GT vs RR : साई सुदर्शनचा मोठा धमाका! मोडला ख्रिस गेलचा खास विक्रम
यापूर्वी कधीही असे वातावरण अनुभवले नव्हते – विराट कोहली
कोहली म्हणाला की, हा सामना त्याच्यासाठी खूप खास होता, पण तो खूप घाबरला होता. कारण तो यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या आणि भरलेल्या स्टेडियममध्ये खेळला नव्हता. त्याला अजूनही आठवते की जेव्हा तो गार्डला चिन्हांकित करत होता आणि मैदानाकडे पाहत होता तेव्हा तो आतून खूप घाबरला होता. चिन्नास्वामी स्टेडियमवर इतक्या मोठ्या गर्दीसमोर आणि इतक्या छान वातावरणासमोर खेळण्याची ही पहिलीच वेळ होती, असे विराट कोहली म्हणाला. त्याने सांगितले की त्याने यापूर्वी कधीही असे वातावरण अनुभवले नव्हते.
हेही वाचा – GT vs RR : साई सुदर्शनच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर उभारला धावांचा डोंगर
मला वाटले की मी इशांतविरुद्ध शॉट मारू शकणार नाही – विराट कोहली
विराट कोहली पुढे म्हणाला की, त्याची आणि इशांत शर्माची जुनी मैत्री आहे. कारण दोघांनीही एकत्र खूप क्रिकेट खेळले आहे. पण जेव्हा इशांतने त्या सामन्यात गोलंदाजी करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला तो एका वेगळ्याच पातळीचा गोलंदाज असल्यासारखे वाटले. कोहलीवर खूप दबाव होता. विराट म्हणाला, “जर मी इशांतविरुद्ध नेटमध्ये खेळलो असतो तर मला अजिबात भीती वाटली नसती. पण सामन्यातील वातावरण आणि गर्दीमुळे मला वाटले की मी इशांतविरुद्ध शॉट मारू शकणार नाही. विकेटही पडली होती, त्यामुळे जास्त दबाव होता.”





