Virat Push Darryl : …अन् विराटने डॅरिल मिचेलला दिला चक्क धक्का! भर मैदानात घडला हा प्रकार; पाहा VIDEO

Virat Kohli Push Darryl Mitchell Video Viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक एकदिवसीय सामन्यात डॅरिल मिचेल नावाच्या वादळाने भारतीय गोलंदाजांची झोप उडवली. सलग दोन शतके ठोकणाऱ्या मिचेलने टीम इंडियाला इतके त्रस्त केले की, अखेर तो बाद झाल्यावर विराट कोहलीने त्याला चक्क ‘धक्का’ देऊन मैदानाबाहेर काढले. मात्र, या धक्क्यामागे राग नसून एक वेगळीच भावना होती.
नेमकं घडलं काय?
न्यूझीलंडच्या डावात १३७ धावांची महाकाय खेळी करून डॅरिल मिचेल जेव्हा बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतू लागला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहून टाळ्या वाजवत होते. सीमारेषेपाशी विराट कोहली उभा होता. मिचेल जवळ येताच कोहलीने त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
Virat Kohli applauding Daryl Mitchell for his incredible knockpic.twitter.com/peNji8EhIX
— RCB Xtra (@Rcb_Xtra) January 18, 2026
जेव्हा मिचेल मैदानाबाहेर जात होता, तेव्हा दोघांमध्ये काहीतरी गप्पा झाल्या आणि विराटने हसत-हसत त्याला ‘लवकर बाहेर जा’ असे खुणावत हलकासा धक्का दिला. हे पाहून दोघेही खळखळून हसले. विराटची ही कृती मिचेलने भारतीय गोलंदाजांना दिलेल्या त्रासावरची एक मजेशीर प्रतिक्रिया होती, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Harshit Rana : हर्षितची ‘ती’ एक चूक भारताला पडली महागात! फिलिप्सला मिळालं जीवदान आणि कीवींनी फिरवला सामना
मिचेलची ऐतिहासिक मालिका –
या मालिकेत डॅरिल मिचेलने टीम इंडियासाठी सर्वात मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्याने या ३ सामन्यांच्या मालिकेत धावांचा डोंगर उभा केला आहे.
- वडोदरा (पहिली वनडे): ८४ धावा.
- राजकोट (दुसरी वनडे): नाबाद १३१ धावा (न्यूझीलंडचा विजय).
- इंदूर (तिसरी वनडे): १३७ धावा (कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या).
मिचेलने या मालिकेत एकूण ३५२ धावा कुटल्या असून भारताच्या विरुद्ध त्याचे हे चौथे एकदिवसीय शतक ठरले आहे.
विराट आणि मिचेलमधील खिलाडूवृत्ती –
विराट कोहली आणि डॅरिल मिचेल यांच्यातील या मजेशीर घटनेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. जरी मिचेलने भारताच्या हातातून मालिका खेचून नेण्याचा प्रयत्न केला असला, तरी विराटने ज्या प्रकारे त्याच्या खेळीचे कौतुक केले, त्यावरून क्रिकेटमधील ‘स्पोर्ट्समन स्पिरिट’ पुन्हा एकदा दिसून आले.





