Virat Kohli Ujjain : तिसऱ्या सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहली महाकालच्या चरणी! कुलदीपसोबत भस्म आरतीला लावली हजेरी, पाहा VIDEO

Virat Kohli Ujjain Temple Visit : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा निर्णायक सामना रविवारी, १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेतील विजयासाठी आणि फॉर्म मिळवण्यासाठी स्टार फलंदाज विराट कोहली आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी शनिवारी पहाटे उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.
पहाटे ४ वाजता भस्म आरतीत सहभाग –
विराट कोहली आणि कुलदीप यादव शनिवारी पहाटे ४ वाजता होणाऱ्या विश्वप्रसिद्ध ‘भस्म आरती’ मध्ये सहभागी झाले. नंदी हॉलमध्ये बसून या दोन्ही खेळाडूंनी सुमारे दोन तास बाबा महाकालाची आरती केली. यावेळी कोहली आणि कुलदीप पूर्णपणे भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भगवान शिवाचा जप केला आणि गर्भगृहाच्या चौकटीतून बाबांना जल अर्पण करून आशीर्वाद घेतले.
#WATCH | Madhya Pradesh | Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli, along with Kuldeep Yadav, offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. pic.twitter.com/GirLTB7j6I
— ANI (@ANI) January 16, 2026
गौतम गंभीर आणि केएल राहुलनेही घेतले दर्शन –
टीम इंडियामध्ये इंदूरला आल्यावर महाकालाचे दर्शन घेण्याची परंपराच बनली आहे. विराटच्या आधी शुक्रवारी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल यांनीही महाकाल मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली होती. मंदिर समितीच्या वतीने विराट आणि कुलदीपला बाबा महाकालाची प्रतिमा आणि प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.
होळकर स्टेडियमवर कोहली ‘बॅड पॅच’ मोडणार?
विराट कोहलीने जगभरातील मैदानांवर धावांचा पाऊस पाडला असला तरी, इंदूरचे होळकर स्टेडियम त्याच्यासाठी आतापर्यंत ‘अनलकी’ ठरले आहे. येथील आकडेवारी कोहलीच्या प्रतिमेला साजेशी नाही. या मैदानात खेळलेल्या एकूण चार डावात त्याने केवळ ९९ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे या मैदानावर कोहलीला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. उद्याच्या निर्णायक सामन्यात महाकालाच्या आशीर्वादाने विराट आपली ही खराब आकडेवारी सुधारेल आणि भारताला मालिका विजय मिळवून देईल, अशी आशा चाहत्यांना आहे.





