IND vs NZ : विराट कोहलीला नेट प्रॅक्टिस दरम्यान दुखापत! न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलला मुकणार?

Virat Kohli injured in net practice : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना रविवारी दुबई येथे खेळला जाणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसल्याने जेतेपदाच्या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी खूप निराशाजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला गुडघ्याला दुखापत झाली आहे. यापूर्वी, विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळला नव्हता.
विराट कोहलीला नेट प्रॅक्टिस दरम्यान दुखापत –
पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान वेगवान गोलंदाजाचा सामना करताना विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली. चेंडू लागताच भारतीय संघाच्या फिजिओने कोहलीवर ताबडतोब उपचार केले, स्प्रे मारला आणि मलमपट्टी केली. यानंतर विराट कोहली पुन्हा नेट प्रॅक्चिससाठी आला नाही. परंतु, संघ व्यवस्थापनाने काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे पुष्टी केली आहे. कोहली अंतिम सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे.
विराटकडे गेलला मागे टाकण्याची संधी –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट भारताचा सर्वोत्तम फलंदाज राहिला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ८४ धावांची महत्त्वाची खेळी खेळून भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. अंतिम सामन्यात विराटची भूमिका महत्त्वाची असेल. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ सामन्यात २१७ धावा केल्या आहेत. ३६ वर्षीय कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करताना १६६ सामन्यांमध्ये ८०६३ धावा केल्या आहेत, ज्या सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत.
विराट कोहली विरोधी संघांची डोकेदुखी –
सध्या विराट कोहलीला लय सापडल्यामुळे विरोधी संघांची डोकेदुखी वाढली आहे. आता तो पुन्हा एकदा किंग म्हणून वर्चस्व सिद्ध करण्यास उत्सुक आहे. जर या अंतिम सामन्यात विराटची बॅट चालली आणि त्याने ४६ धावा केल्या, तर तो (७४६) ख्रिस गेलला मागे टाकत मोठ्या विक्रमाला गवसणी घालू शकतो. गेल (७९१) सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे.





