IND vs AUS : पहिल्याच सामन्यात विराट कोहलीसोबत हे काय घडलं? ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच झालं असं

Virat Kohli has been dismissed on duck : भारतीय क्रिकेट संघाने आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थ येथे पहिल्या एकदिवसीय सामन्याने केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, दोन्ही दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. यासह त्याने एक नकोसा विक्रम पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात केला.
रोहित-कोहलींची निराशाजनक कामगिरी –
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला. चौथ्या षटकातच भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहित अवघ्या 8 धावा काढून बाद झाला. त्याच्यापेक्षा विराट कोहलीचा खराब फॉर्म अधिकच चर्चेत आला. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला, पण तो खातेही उघडू शकला नाही. विशेष म्हणजे, विराट कोहली पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला, जे ऑस्ट्रेलियात यापूर्वी कधीही घडले नव्हते. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्याला बाद केले.
मिशेल स्टार्कच्या जाळ्यात अडकला कोहली –
Virat Kohli 0(8) ball by ball 🥎 .
— W🇦🇺 (@50cennturywheen) October 19, 2025
मिशेल स्टार्कने सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीला बाद केले. स्टार्कने अतिशय चतुराईने कोहलीला जाळ्यात अडकवले. पाचव्या षटकात कोहलीने स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव काढली नव्हती आणि ते षटक मेडन ठरले होते. त्यानंतर सातव्या षटकात कोहली स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर चुकीचा फटका खेळून बाद झाला.
हेही वाचा – IND vs AUS : पहिल्या सामन्यात फ्लॉप, तरी रोहित शर्माने गाठला ‘हा’ ऐतिहासिक टप्पा
कूपर कोनोलीने घेतला शानदार झेल –
विराटने ऑफ स्टंपच्या बाहेरच्या शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडूवर चुकीचा फटका खेळला आणि चेंडूने त्याच्या बॅटचा बाह्य किनारा घेतला. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या डाव्या बाजूला हवेत गेला, जिथे कूपर कोनोलीने उडी मारून शानदार झेल घेतला. यामुळे कोहलीच्या पुनरागमनावर पाणी फिरले. रोहित आणि कोहली यांच्यानंतर कर्णधार शुभमन गिल यालाही अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिल 8 धावा काढून नाथन एलिसचा बळी ठरला.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : ऋतुराज-पृथ्वीच्या खेळीवर पावसाने फेरलं पाणी, महाराष्ट्र-केरळ सामना अनिर्णीत!
विराटच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –
विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 ते 7 क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक 39 वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांचे नाव आहे, ज्यांच्या नावावर प्रत्येकी 34 शून्यावर (डक) बाद होण्याचा विक्रम आहे. या सामन्याने भारतीय संघाला सुरुवातीला मोठा धक्का बसला असून, आता उर्वरित फलंदाजांवर संघाला सावरण्याची जबाबदारी आहे.





