IND vs AUS : विराटने दिले निवृत्तीचे संकेत? सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर VIDEO व्हायरल

Virat Kohli’s Gesture Sparks Retirement Rumors : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तर भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. सलामीवीर शुबमन गिल ९ धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला विराट कोहली अवघ्या तिसऱ्या चेंडूवर शून्यावर पायचित होऊन माघारी परतला. मैदानाबाहेर जाताना त्याने हात वर करून केलेल्या इशाऱ्याने निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर प्रथमच वनडे मालिका खेळणाऱ्या विराटला सात महिन्यांच्या विश्रांतीनंतरही लय सापडलेली नाही. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात पर्थ येथेही तो ८ चेंडू खेळून शून्यावर झेलबाद झाला होता. अॅडलेडच्या या सामन्यातही त्याला खाते उघडता आले नाही. सहसा शून्यावर बाद न होणाऱ्या विराटला सध्या एकेरी-दुहेरी धावा घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
विराटचा व्हिडीओ होतोय व्हायरल –
Is Virat Kohli planning retirement after this series?#Kohli #INDvsAUS pic.twitter.com/wU9d26ys2p
— Abhishek (@_Abhi_Ke_Abhi) October 23, 2025
अॅडलेड ओव्हल हे विराटच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे, जिथे त्याचा रेकॉर्ड नेहमीच दमदार राहिला आहे. हा त्याचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा दौरा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शून्यावर बाद झाल्याने तो नाराज दिसला. मात्र, चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विराटने हात वर करून केलेल्या इशाऱ्याने अनेक तर्कवितर्कांना जन्म दिला. काहींच्या मते, हा इशारा वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या दिशेने संकेत असू शकतो, तर काहींनी तो अॅडलेडमधील शेवटच्या सामन्यासाठी चाहत्यांचे अभिवादन असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – IND vs AUS : रोहित शर्माने अॅडलेडमध्ये रचला इतिहास, गांगुली-गिलख्रिस्टला टाकलं मागे!
भारताने ऑस्ट्रेलियाला दिले २६५ धावांचे लक्ष्य –
भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांनंतर हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या भागीदारीने भारताने ५० षटकांत नऊ गडी बाद २६४ धावा केल्या. भारताकडून रोहितने सर्वाधिक धावा केल्या आणि ७३ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने ६१ धावांची खेळी केली. रोहित आणि श्रेयसमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी झाली.





