Rohit Retirement Speculations : ‘हिटमॅन’च्या निवृत्तीच्या चर्चांना अचानक उधाण! विराटचा ‘तो’ निराश फोटो अन् शास्त्रींच्या विधानाने चाहत्यांची धाकधूक वाढली
Rohit Retirement Speculations : विराट कोहलीचा एक निराश फोटो आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे समालोचनादरम्यानचे विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे,

Rohit Sharma ODI Retirement Virat Kohli Emotional Photo Ravi Shastri Commentary : भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील शेवटच्या सामन्याच्या चर्चांनी आता गंभीर वळण घेतले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान काही अशा घडामोडी घडल्या, ज्याने या चर्चांना अधिक बळ दिले आहे. मैदानाबाहेर बसलेल्या विराट कोहलीचा एक निराश फोटो आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे समालोचनादरम्यानचे विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विराटचा ‘तो’ व्हायरल फोटो आणि धोनीची आठवण!
कार्डिफ येथील दुसऱ्या सामन्यादरम्यानचा ड्रेसिंग रुममधील एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट कोहली अत्यंत निराश आणि भावुक चेहऱ्याने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये बसलेला दिसत आहे. ६५ धावांवर बाद झाल्यानंतर कोहली स्वतःच्या विकेटमुळे दुःखी असावा, असे आधी वाटत होते. मात्र, रोहितच्या निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान हा फोटो आल्यामुळे चाहत्यांनी याचा संबंध थेट ‘हिटमॅन’च्या निरोपाशी जोडला आहे. २०१४ मध्ये जेव्हा एमएस धोनीने अचानक कसोटी निवृत्ती घेतली होती, तेव्हाही ड्रेसिंग रुममध्ये असेच भावुक वातावरण होते, याची आठवण चाहत्यांनी करून दिली आहे.
रवी शास्त्रीच्या कॉमेंट्रीने वाढवला सस्पेन्स!
दुसरीकडे, सामन्यादरम्यान समालोचन करताना रवी शास्त्री यांनी अचानक रोहित शर्माच्या कारकिर्दीचे आणि नेतृत्वाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. शास्त्री म्हणाले, “रोहित प्रदीर्घ काळ भारतीय संघाचा मुख्य कणा राहिला आहे. त्याने टी-२० विश्वचषक जिंकला, पण ५० षटकांचा विश्वचषक जिंकता आला नाही. मात्र, विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.” थेट प्रक्षेपणात समालोचकांनी रोहितच्या भूतकाळातील आठवणी काढल्यामुळे, त्याचा पुढचा सामना हा निरोपाचाच सामना असल्याचे मानले जात आहे.
लॉर्ड्सवर होणार अखेरचा फैसला?
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, निवड समितीने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत रोहितला २०२७ च्या विश्वचषक योजनांमधून वगळल्याचा निरोप दिला आहे. या निर्णयावर रोहित प्रचंड नाराज आहे. कसोटी आणि टी-२० मधून आधीच निवृत्त झालेल्या रोहितचा रविवारी लॉर्ड्सवर होणारा सामना हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असेच संकेत या सर्व घडामोडींवरून मिळत आहेत.





