Virat Kohli Century : किंग कोहलीचा पुन्हा शतकी धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड!

Virat Kohli Century against South Africa in 2nd ODI Match : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. रांची येथे झालेल्या पहिल्या वनडेत शतक झळकावल्यानंतर कोहलीने रायपूरमध्ये (३ डिसेंबर) दुसऱ्या वनडे सामन्यातही शानदार शतक ठोकले. या शतकासह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर त्याने इतरही काही विक्रम केले.
रायपूर वनडे सामन्यातही टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर लवकर गमावावे लागले. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने नेहमीच्या शैलीत डाव सांभाळला आणि आपले शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एकाच फलंदाजीच्या क्रमावरील (Position) सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही मोडला.
रांचीनंतर रायपूरमध्येही कोहलीचा शतकी धमाका –
Stupendous. Remarkable. Exemplary 🫡
Recap Virat Kohli’s 53rd ODI Hundred 🎥🔽 https://t.co/9jolWYnnTB#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/9rTVm77Xq1
— BCCI (@BCCI) December 3, 2025
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत नाणेफेक गमावल्याने पुन्हा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. यानंतर सलामीवीर लवकर बाद झाल्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीकडे लागल्या होत्या. कोहलीने चौथ्याच चेंडूवर जबरदस्त पुल शॉट मारत षटकार लगावला आणि आपले खाते उघडले.
यानंतर तो मोठ्या वेगाने धावफलक पुढे नेत राहिला. त्याने ४७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. काही वेळातच ३८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने वनडे कारकिर्दीतील आपले ५३ वे शतक पूर्ण केले. शतकानंतर त्याने नेहमीप्रमाणे हवेत उडी मारली, गळ्यातील एंगेजमेंट रिंगचे चुंबन घेतले आणि आकाशाकडे पाहून आनंद व्यक्त केला.
या शानदार शतकामुळे विराट कोहलीने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
- सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला : सचिन तेंडुलकरने सलामीवीर (ओपनर) म्हणून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४५ शतके झळकावली होती. कोहलीने आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपले ४६ वे शतक पूर्ण करत हा विश्वविक्रम मोडला आहे.
- सलग दोन शतके : वनडे क्रिकेटमध्ये ही ११ वी वेळ आहे, जेव्हा कोहलीने सलग २ किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत. हा देखील एक विश्वविक्रम आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने ६ वेळा ही कामगिरी केली आहे.
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ वे शतक : कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. २०२३ वर्ल्ड कपमधील शतकानंतर त्याने आता या मालिकेत सलग दोन शतके ठोकली. हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे त्याचे एकूण ७ वे वनडे शतक आहे.
मात्र, या सामन्यात कोहली आपल्या शतकाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही आणि ९३ चेंडूंमध्ये १०२ धावा करून बाद झाला.





