Virat Anushka Alibaug : विराट-अनुष्काची अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक! तब्बल इतक्या कोटींना खरेदी केली ५ एकर जमीन

Virat Anushka Alibaug Land Deal : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली या लोकप्रिय दांपत्याचे अलिबाग प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘सेकंड होम’साठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये या दोघांनी तब्बल ३७.८६ कोटी रुपयांची ५.१ एकर जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारामुळे अलिबागच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
कुठे आहे ही जमीन?
रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स कंपनी ‘CRE Matrix’ ने दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन अलिबागमधील झिराड या अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. १३ जानेवारी रोजी हा व्यवहार पूर्ण झाला असून, विराट-अनुष्काने ही जमीन सोनाली अमित राजपूत यांच्याकडून विकत घेतली आहे. या व्यवहारासाठी सुमारे २.२७ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे.
भाऊ विकास कोहलीने पूर्ण केली प्रक्रिया –
विराट कोहली सध्या क्रिकेटच्या कामात व्यस्त असल्याने, या जमिनीच्या व्यवहाराची सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि नोंदणी विराटचा मोठा भाऊ विकास कोहली याने पूर्ण केली. या व्यवहारात शेजारील दोन मोठ्या भूखंडांचा समावेश आहे.
हेही वाचा – David Warner Record : डेव्हिड वॉर्नरचा धमाका! तुफानी शतक झळकावत विराट कोहलीचा मोडला विक्रम
अलिबागमध्ये वाढला गुंतवणुकीचा वेग –
विराट आणि अनुष्कासाठी अलिबागमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०२२ मध्ये त्यांनी ८ एकर जमीन सुमारे १९.२४ कोटी रुपयांना खरेदी केली होती. याच जमिनीवर त्यांनी एक आलिशान ‘लक्झरी व्हेकेशन होम’ उभारले आहे. अलिबागमध्ये ‘समीरा हॅबिटॅट्स’ सारख्या बड्या समूहांच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या जमिनीचे व्यवहार वेगाने होत आहेत.
सेलिब्रिटींच्या पसंतीमुळे अलिबागचे भाव वधारले –
रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, विराट-अनुष्कासारख्या ‘हाय प्रोफाइल’ सेलिब्रिटींनी झिराड परिसरात जमीन घेतल्यामुळे त्या भागाचे महत्त्व वाढले आहे. यामुळे इतर श्रीमंत गुंतवणूकदारही अलिबागकडे वळत असून जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. अलिबागमध्ये आता केवळ छोटे बंगलेच नाही, तर हिरानंदानी ग्रुपसारख्या मोठ्या डेव्हलपर्सचे ‘हिरानंदानी सॅण्ड्स’ सारखे भव्य टाउनशिप प्रोजेक्ट्सही उभे राहत आहेत.





