Rohit Sharma : हिटमॅनचा फ्लॉप शो! १५ वर्षांनंतर रोहित शर्माची सर्वात खराब कामगिरी; २०२७ वर्ल्ड कपचं स्वप्न धूसर होणार?

Rohit Sharma Worst Record : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा याच्यासाठी २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इंदूरमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यातही रोहित स्वस्तात बाद झाला आणि एका नकोशा विक्रमाची त्याच्या नावावर नोंद झाली.
निर्णायक सामन्यातही निराशा –
न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहितने डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आश्वासक सुरुवात केली. मात्र, त्यानंतर तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला. चौथ्या षटकात जॅक फोक्सच्या चेंडूवर त्याला जीवदानही मिळाले, पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. अखेरीस मोठा शॉट मारण्याच्या नादात तो मिड-ऑनला झेल देऊन बाद झाला. रोहितला केवळ ११ धावा करता आल्या.
१५ वर्षांतील सर्वात निचांकी कामगिरी –
या मालिकेत रोहितने केवळ फलंदाजीच गमावली नाही, तर त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब सरासरीची नोंद केली आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत रोहितच्या बॅटमधून फक्त ६१ धावा (सरासरी २०) निघाल्या.
हेही वाचा – Virat Push Darryl : …अन् विराटने डॅरिल मिचेलला दिला चक्क धक्का! भर मैदानात घडला हा प्रकार; पाहा VIDEO
- वडोदरा (पहिली वनडे): २६ धावा
- राजकोट (दुसरी वनडे): २४ धावा
- इंदूर (तिसरी वनडे): ११ धावा
२०१३ मध्ये पूर्णवेळ सलामीवीर बनल्यानंतर रोहितची ही सर्वात खराब मालिका ठरली आहे. यापूर्वी २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत त्याने फक्त ४९ धावा केल्या होत्या, मात्र तेव्हा तो कायमस्वरूपी सलामीवीर नव्हता.
फॉर्ममध्ये अचानक घसरण –
विशेष म्हणजे, रोहित गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने २०१ धावा कुटल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरली. तिन्ही सामन्यांत तो मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. त्याच्या या फॉर्ममुळे आता आगामी स्पर्धांमधील त्याच्या स्थानावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.





