Donald Trump buffalo : ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हशीला अखेर जीवदान! बांगलादेश सरकारच्या हस्तक्षेपाने ईदच्या कुर्बानीतून सुटका
Donald Trump buffalo : सुमारे ७०० किलो वजनाच्या या म्हशीची कुर्बानीसाठी विक्रीही झाली होती. मात्र, ईदपूर्वी तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने लोकांची गर्दी वाढू लागली. सुरक्षेच्या कारणास्तव अखेर गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करत कुर्बानी थांबवण्याचा निर्णय घेतला.

Donald Trump buffalo : सोनेरी केसांच्या झुपक्यामुळे ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे टोपणनाव मिळालेल्या दुर्मीळ अल्बिनो म्हशीला बांगलादेश सरकारच्या हस्तक्षेपामुळे ईदच्या कुर्बानीतून अखेर जीवदान मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या म्हशीबाबात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
सुमारे ७०० किलो वजनाच्या या म्हशीची कुर्बानीसाठी विक्रीही झाली होती. मात्र, ईदपूर्वी तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. सुरक्षेच्या कारणास्तव अखेर गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करत कुर्बानी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी संबंधित खरेदीदाराला त्याचे पैसे देण्याचे आणि म्हशीला ढाका येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात हलवण्या आदेश दिले आहेत.
A rare albino buffalo in Bangladesh — nicknamed ‘Donald Trump’ for its distinctive blond tuft — has been spared from the Eid al-Adha sacrifice after a last-minute government intervention, and relocated to the capital’s main zoo https://t.co/SZ9yH46eCh pic.twitter.com/rbVrYMA2Wy
— Reuters (@Reuters) May 28, 2026
“जनतेमध्ये निर्माण झालेली प्रचंड उत्सुकता आणि सुरक्षेच्या कारणांमुळे अखेरच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला,” असे गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
म्हशीचे मालक झियाउद्दीन मृधा यांनी सांगितले की, त्यांच्या धाकट्या भावाने या म्हशीच्या सोनेरी झुपक्यामुळे तिची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आणि त्यावरूनच हे नाव पडले.
ही म्हैस स्वभावाने अत्यंत शांत असून तिची विशेष काळजी घ्यावी लागते. वारंवार खाद्य देणे आणि नियमित अंघोळ घालणे आवश्यक असल्याचे मृधा यांनी सांगितले.
बांगलादेशात अल्बिनो म्हशी अत्यंत दुर्मीळ मानल्या जातात. बहुतेक जनावरे गडद रंगाची असल्याने ही म्हैस आधीच वेगळी ठरत होती. मात्र, ‘डोनाल्ड ट्रम्प’ या नावामुळेच तिची लोकप्रियता शिगेला पोहोचली आणि अखेरीस तिचा जीव वाचला.





