अहिल्यानगरमध्ये रांगोळीवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे हिंसक आंदोलन; 30 जण ताब्यात

अहिल्यानगर : अहिल्यानगरात ‘आय लव मोहम्मद’ या वादग्रस्त प्रकरणावरून हिंसक आंदोलन झाल्याने पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतले असून, जमावाला पांगवण्यासाठी हलका लाठीचार्ज करावा लागला, अशी माहिती अहिल्यानगर पोलिसांनी दिली. नवरात्रीच्या काळात काही व्यक्तींनी मुस्लिम समुदायाविरोधात आक्षेपार्ह रांगोळी बनवल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या समुदायातील लोकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आणि गुन्हा दाखल केला.
मात्र, यानंतरही आंदोलक शांत झाले नाहीत आणि त्यांनी कोटला परिसरात निदर्शने सुरू केली. पोलिसांनी सांगितले की, सुमारे अर्धा तास आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलन हिंसक बनले आणि आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यात काही वाहनांचे नुकसान झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपअधीक्षक दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Maharashtra | Ahilyanagar Police have detained 30 people after a protest went violent, and police had to resort to mild lathi charge. Incidents began this morning around 7 AM. During Navratri celebrations, someone had made a Rangoli with some objectionable elements against the…
— ANI (@ANI) September 29, 2025
शांतता राखण्याचे आवाहन –
या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील काही आक्षेपार्ह होर्डिंग्ज काढण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. अफवांमुळे शहरातील बाजारपेठेतील दुकाने बंद राहिली. उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य –
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या घटनेमागे कोणताही कट आहे का, याचा तपास करावा लागेल. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीप्रमाणे ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत आहे का, याचीही तपासणी करू. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, पण अशा प्रकारे तणाव निर्माण करणे चुकीचे आहे.” दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मंगळवारी अहिल्यानगरात पूर्वनियोजित सभा आहे. यामुळे शहरातील तणावपूर्ण वातावरणात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.





