अतिशी, भारद्वाज यांच्यासह अनेक आप कार्यकर्त्यांची धरपकड ! पोलिसांनी रस्ते रोखल्याने दिल्लीत वाहतूक कोंडी

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेल्याअटकेच्या निषेधार्थ आम आदमीपक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत उग्र निदर्शने केली. यावेळी दिल्लीचे मंत्री सौरव भारद्वाज, आणि अतिशी यांच्या सह अनेक आप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. दिल्ली पोलिसांनी निदर्शनांची शक्यता लक्षात घेऊन भाजप मुख्यालय व ईडीच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केल्याने मध्य दिल्लीतील वाहतूक पुर्ण विस्कळीत झाली आहे.
कलम १४४ अन्वये या परिसरात लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश लक्षात घेऊन आप आणि भाजप कार्यालयाजवळ असलेल्या आयटीओ चौकात अधिकाऱ्यांनी आंदोलकांना पांगवले आणि अतिशी व भारद्वाज यांच्या सह अनेकांना ताब्यात घेतले.
या संबंधात अतिशी यांनी म्हटल आहे की, आयटीओ येथे शांततेने आंदोलन करत असताना मला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधी हे लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या केसेसमध्ये अटक करतात, आणि आता शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनाही अटक केली जात आहे. ही लोकशाहीची हत्या नाही तर. मग काय आहे?.
आयटीओ येथे आप समर्थकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्या नेत्यांच्या सुटकेची मागणी केली. दोन्ही पक्षांचे मुख्यालय असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स उभे केले आहेत आणि त्या भागातील वाहतूक रोखून धरली आहे. त्यांनी आप मुख्यालयापासून भाजप कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड उभारले आहेत, एकमेकांवर दगडफेक केली जात आहे असेही सांगण्यात येत आहे.
गर्दीच्या वेळी आयटीओ चौक, राज घाट आणि विकास मार्गाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली. ईडी कार्यालयाकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी केजरीवाल यांच्या अटकेनंतर ‘आप’ने देशभरात भाजपविरोधात आंदोलनाची हाक दिली होती.





