सीरियात रक्तरंजित हत्याकांड ! सुरक्षा दलांनी तब्बल १००० लोकांची केली हत्या ; लहान मुलं अन् महिलांचाही बळी

Violence in Syria । सीरियामध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचाराचा एक नवीन टप्पा सुरू झाला. सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा (अबू मोहम्मद अल-जौलानी) यांच्या सरकारच्या एचटीएस सुरक्षा दलांनी अलावाइट अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, गेल्या ४ दिवसांपासून सीरियामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक जण माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांना पाठिंबा देणारे नागरिक होते आणि ते सर्व अलावाइट अल्पसंख्याक समुदायाचे होते. त्याच वेळी, या समुदायातील महिलांवरही हिंसाचार झाला आहे. महिलांना रस्त्यावर नग्न करून फिरवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ल्यात अलावाइट समुदायाच्या लोकांना लक्ष्य Violence in Syria ।
ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स (SOHR) ने या हिंसाचाराविषयी माहिती दिली आहे. त्यांनी, “शुक्रवार (७ मार्च) आणि शनिवारी (८ मार्च) सीरियातील अलावाइट समुदायाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांमध्ये जवळपास ७४५ नागरिकांचा मृत्यू झाला.” असे म्हटले आहे. याशिवाय १२५ सरकारी सुरक्षा कर्मचारी आणि १४८ असद समर्थकही मारले गेले आहेत. त्याच वेळी, लताकिया शहराच्या आसपासच्या भागात वीज आणि पाण्याचा पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे आणि या भागात मोठ्या संख्येने अलावाइट अल्पसंख्याक समुदायाचे लोक राहतात.
‘रस्त्यावर उभे असताना गोळी लागली’ Violence in Syria ।
सीरियामध्ये हिंसाचाराचा हा काळ सुरू झाला जेव्हा असद समर्थकांनी लताकिया भागात सीरियन सुरक्षा दलांवर हल्ला केला. हा परिसर असद समर्थक अल्पसंख्याक अलावाइट समुदायाचा बालेकिल्ला आहे. साक्षीदारांचे म्हणणे आहे की, अलावाइट महिलांना पकडण्यात आले, त्यांना नग्न करून मिरवण्यात आले आणि नंतर गोळ्या घातल्या गेल्या.
“सीरियन सुरक्षा दलांनी नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू केला,” असे बानियास शहरातील एका रहिवाशाने स्काय न्यूजला सांगितले. त्याने कोणालाही मागे सोडले नाही.” दरम्यान, अली शेहा नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, “बनियासमध्ये त्याचे किमान २० शेजारी आणि सहकारी मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत, मोठ्या संख्येने लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत.”





