Pakistan News: पाकिस्तानमध्ये शुक्रवारी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरपंथी गटाच्या निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला विरोध करणाऱ्या टीएलपी समर्थकांनी अमेरिकन दूतावासाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही चकमक झाली. टीएलपीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबाराचा आरोप केला असून, 11 कार्यकर्ते ठार आणि 50 हून अधिक जखमी झाल्याचा दावा केला आहे. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने इस्लामाबाद आणि रावळपिंडीत मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्या आणि प्रमुख रस्ते अडवले. रेड झोन पूर्णपणे सील करण्यात आले. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांनी टीएलपी मुख्यालयावर छापा टाकून नेते साद रिझवी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पळून गेले. यात 10 हून अधिक पोलिस जखमी झाले. रावळपिंडीत कलम 144 लागू करून निदर्शने, रॅली आणि लाऊडस्पीकर वापरावर 11 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पाकच्या पंजाबमध्येही 10 दिवसांसाठी कलम 144 लागू आहे. टीएलपीची स्थापना 2017 मध्ये खादिम हुसेन रिझवी यांनी केली होती. 2023 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर साद रिझवी यांनी नेतृत्व स्वीकारले.