अटींचा भंग पडला महाग! MIDC ने रिलायन्स कंपनीकडून घेतला भूखंड परत

बारामती – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) भाडेपट्टा कराराच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे मे. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याकडून भूखंडाचा ताबा परत घेतला आहे. हा भूखंड ५ नोव्हेंबर २००९ रोजी करारान्वये कंपनीला वाटप करण्यात आला होता.
MIDC च्या करारातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर महामंडळाने १६ जानेवारी २०२५ रोजी कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज (८ एप्रिल) पंचनामा करून भूखंडाचा ताबा अधिकृतपणे परत घेण्यात आला. याबाबत माहिती देताना बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी सांगितले की, “कराराच्या अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.” MIDC ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली. या कारवाईमुळे अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना चांगलाच दणका बसला आहे.





