Top 10 News : विनोद तावडेंचा मोठा गौप्यस्फोट ते पाकिस्तानचे दोन तुकडे? वाचा आजच्या दहा बातम्या
Top 10 News : विनोद तावडेंचा मोठा गौप्यस्फोट ते पाकिस्तानचे दोन तुकडे? वाचा आजच्या दहा बातम्या

Top 10 News : 1) धनंजय मुंडे, सुनील शेळकेंना मंत्रिपदाची संधी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू?
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीडचे आमदार धनंजय मुंडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही चर्चा आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाढलेल्या टीकेमुळे धनंजय मुंडे यांनी मार्च २०२५ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही आरोपींबाबतच्या त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळते का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
2) “फडणवीसांना 15 वर्षांपूर्वी मीच वारीत आणलं”; विनोद तावडेंचा मोठा गौप्यस्फोट
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. आषाढी वारीदरम्यान माध्यमांशी बोलताना, “15 वर्षांपूर्वी मीच देवेंद्र फडणवीसांना वारीत सहभागी करून घेतलं आणि त्याच पुण्याईने त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली,” असे तावडे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, “पद महत्त्वाचे नाही, जनतेची सेवा महत्त्वाची आहे. मी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं असतं, तेच आज देवेंद्रजी करत आहेत,” असे सांगत फडणवीसांचे कौतुक केले. दरम्यान, तावडे यांनी अलीकडेच एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलेय. (Top 10 News)
3) बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मृत्यूनंतर कुटुंबाला 6.5 लाखांपर्यंत मदत
राज्यातील बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 3 लाख 50 हजार रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास 6 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. कामगार कायमस्वरूपी दिव्यांग झाल्यास 2 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय महिलांसाठी मातृत्व लाभ आणि नोंदणीकृत कामगारांसाठी निवृत्तीनंतर वेतन योजनेचाही विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार कायद्यांतील सुधारणांमध्ये व्यापक कामगार हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Top 10 News)
4) तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा! बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याची बतावणी करून स्वीट मार्ट मालकाकडून 6 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या FDAच्या धडक कारवायांचा गैरफायदा घेत आरोपींनी दुकान सील करणे, गुन्हा दाखल करणे आणि बदनामी करण्याची धमकी देत सुरुवातीला 12 लाखांची मागणी केली होती. वाटाघाटीनंतर त्यांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि अन्य एका साथीदाराविरोधात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलीय. आरोपींवर यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. (Top 10 News)
5) वारीत पुन्हा अपघात! भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले
जेजुरीतील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आषाढी वारीत आणखी एक अपघात घडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात भरधाव पिकअपने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिली. दिंडी क्रमांक 19 मधील वसंतराव गवते हे नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पिकअप चालक वाहन जागीच सोडून फरार झाला. नगर तालुका पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय. सलग घडणाऱ्या अपघातांमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. (Top 10 News)
6) मुख्यमंत्री विजय यांची ‘नायक’ स्टाईल कारवाई, एका झटक्यात बड्या पोलीस अधिकाऱ्याला हटवले
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मोठा प्रशासकीय निर्णय घेत DVACचे संचालक IPS ए. अरुण यांची पदावरून बदली केलीय. नियुक्तीला दोन महिनेही पूर्ण झाले नसताना हा निर्णय घेतल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अरुण यांची तामिळनाडू पोलीस अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, IG सी. मदेश्वरी यांच्याकडे DVAC संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. अरुण यांच्या नियुक्तीवर यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने तसेच विरोधकांनी आक्षेप घेतला होता. भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या प्रमुखपदी निष्कलंक प्रतिमा आणि उच्च सचोटी असलेला अधिकारी असावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री विजय यांच्या या निर्णयाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. (Top 10 News)
7) पाकिस्तानचे दोन तुकडे? सोशल मीडियावर व्हायरल पत्रामुळे खळबळ
पाकिस्तानातील बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पत्रातून करण्यात आला असून त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. या पत्रानुसार, ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ नावाने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करण्यात आली असून सुमारे 85 टक्के भूभागावर नियंत्रण, स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत, चलन आणि प्रशासन लागू केल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच खनिजसंपत्ती आणि नैसर्गिक वायू क्षेत्रांवरही नियंत्रण मिळवल्याचे म्हटलेय. मात्र या सर्व दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कोणत्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. दरम्यान, बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी हिंसाचार आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनलीय. (Top 10 News)
8) Hero Vida VX2 Plus लॉन्च; 187 किमी रेंज, 90 किमी टॉप स्पीडसह स्मार्ट फीचर्सची मेजवानी
हिरो मोटोकॉर्पच्या Vida ब्रँडने नवीन Vida VX2 Plus 4.4kWh इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च केलीय. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1.44 लाख रुपये असून सवलतीनंतर प्रभावी किंमत सुमारे 1.14 लाख रुपये आहे. स्कूटरमध्ये दोन रिमूव्हेबल 2.2kWh बॅटऱ्या असून एका चार्जमध्ये 187 किमी IDC रेंज मिळते. 90 किमी प्रतितास टॉप स्पीड आणि 0 ते 40 किमी वेग फक्त 3.1 सेकंदांत गाठण्याची क्षमता यामुळे ती दमदार पर्याय ठरते. 4.3 इंच TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, OTA अपडेट्स, इको-राइड-स्पोर्ट मोड्स अशी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर किफायतशीर आणि प्रगत पर्याय मानली जातेय. (Top 10 News)

9) ‘तुंबाड 2’मध्ये आलिया भट्टची दमदार एन्ट्री; हस्तरच्या रहस्यविश्वात नव्या भूमिकेत झळकणार
बहुप्रतीक्षित ‘तुंबाड 2’ चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट अधिकृतपणे सहभागी झाली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची घोषणा केलीय. याआधी नवाझुद्दीन सिद्दीकीच्या एन्ट्रीनंतर आता आलियाच्या सहभागामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढलीय. अभिनेता-निर्माते सोहम शाह, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि आलिया भट्ट यांची ही पहिलीच जुगलबंदी असणार आहे. मात्र आलिया नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आलियाने ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहिल्यापासून त्याच्या विश्वाने आपल्याला भुरळ घातल्याचे सांगत या प्रकल्पाचा भाग होण्याचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, ‘तुंबाड 2’ हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Top 10 News)
10) अभिषेक शर्माबाबत दिल्ली हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; ३६ तासांत लिंक्स हटवण्याचे आदेश!
भारतीय क्रिकेटर अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे रक्षण करत दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. न्यायालयाने सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाईन विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना अभिषेकच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो किंवा आवाजाचा व्यावसायिक वापर करण्यास बंदी घातलीय. अभिषेकने त्याच्या एआय (AI) इमेज आणि डीपफेक व्हिडिओंद्वारे प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप केला होता, तसेच विनापरवानगी त्याची बनावट जर्सी व पोस्टर्स विकले जात होते. जस्टिस ज्योती सिंग यांनी मेटा, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला ३६ तासांच्या आत अशा सर्व अनधिकृत लिंक्स आणि डीपफेक कंटेंट हटवण्याचे कडक निर्देश दिलेत. (Top 10 News)




