Satara | विनोद कुलकर्णी यांच्या नियुक्ती साहित्यिक उपक्रमांना उभारी देईल

सातारा, (प्रतिनिधी) – विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळावरची नियुक्त सातारा शहर व जिल्ह्यासह राज्यभरातील साहित्यिक उपक्रमांना भरारी देईल.
यामुळे सातारा जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, विचारवंत यांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनात व विविध साहित्यिक उपक्रमात आपला साहित्यिक ठसा उमटवण्यासाठी मदत व प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कुपर उद्योग समूहाचे मनुष्यबळ संसाधनाचे महाव्यवस्थापक आणि साहित्यप्रेमी नितीन देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळावर सदस्यपदी निवडीबद्दल विनोद कुलकर्णी यांचा दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि सातारकर नागरिकांतर्फे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस, आम्ही पुस्तकप्रेमी समुहाचे डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, संध्या चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या साहित्य सेवेचा आढावा घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने सातार्यातून एक लाख पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली. दिल्लीमध्ये जाऊनही आंदोलन केले.
या सर्व गोष्टी सातारकरांसमोर उघड करताना ते भावूक झाले होते. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या सर्व घटना त्यांनी सातारकरांसमोर उघड्या केल्या.
भविष्यात सातारकर यांच्या आशीर्वादाने सातार्यामध्ये मराठी साहित्य संमेलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांनी केलेली निर्णायक कृती ही उलगडून दाखवली.
डॉ. संदीप श्रोत्री यांनी कुलकर्णी हे सदस्यपदी नियुक्त झाल्याने सातारच्या साहित्य चळवळीला मोठे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि सातारकर विनोद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी नेमणूक होणे या दोन्ही घटना शुभ सूचक असल्याने त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला होईल, असे सांगितले.
आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी विनोद कुलकर्णी यांनी जनता सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढताना जे परिश्रम घेतले त्याचा विस्तार पूर्वक आढावा घेतला.
डॉ श्याम बडवे यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. सारिका देशपांडे, पद्माकर पाठकजी, डॉ.रविंद्र भोसले, डॉ कांत फडतरे, हेमंत कासार,अनंत जोशी, वजीर नदाफ, विनायक भोसले, जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनिल जठार, जनता बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उमेश साठे आणि मान्यवर, सातारकर उपस्थित होते.


