Haryana Election 2024: कुस्तीपटू विनेश फोगट राजकारणात प्रवेश करणार? बहीण बबितांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या चर्चेला उधाण

Haryana Assembly Election 2024: सध्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटची जगभरात चर्चा होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या वजनापेक्षा फक्त 100 ग्रॅम जास्त वजन भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते. आता बातम्या येत आहेत की पॅरिसमधून निराश होऊन परतलेली दिग्गज पैलवान आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
कुस्तीपटू विनेश फोगट आपली चुलत बहीण बबिता फोगट विरुद्ध हरियाणा विधानसभा निवडणूक लढवू शकते. आयएएनएस या वृत्तसंस्थेने विनेशच्या कौटुंबिक सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. फोगट कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले, ‘हो, का नाही? हरियाणा विधानसभेत विनेश फोगट विरुद्ध बबिता फोगट आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.
विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली कारण तिला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले. शनिवारी विनेशचे सोनीपतमधील बलाली या गावात जोरदार स्वागत करण्यात आले.
ति पॅरिसमधून भारतात परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी विनेशला पुष्पहार अर्पण केला. विनेशची मनधरणी करण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विनेश कोणत्या पक्षात सामील होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.





