शिक्षणाला नवं बळ..! पुण्यात गरजू-गुणवंतांसाठी ‘विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’

पुणे : कोणताही गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या हेतूने ‘विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ उपक्रमाचे आयोजन सोमेश्वर फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत पुण्यात शिक्षण घेत असलेल्या गरीब, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून यासाठी ७ ते २० जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
कार्यसम्राट विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात शिष्यवृत्ती वितरण समारंभ होणार आहे. फाउंडेशनचे सनी विनायक निम्हण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्रमिक पत्रकार भवनात आयोजित या पत्रकार परिषदेला उमेश वाघ, बिपीन मोदी, निलेश पटेल (माजी नगराध्यक्ष, येवला), वेदांत बांदल हे उपस्थित होते.
तिसरे वर्ष, शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
शिष्यवृत्ती उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी ३९६ विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या वर्षी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. यावर्षी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे पाचवी ते आठवीच्या अशा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे,
अर्ज प्रक्रिया, अटी व पात्रता यासाठी विद्यार्थ्यांनी www.sunnynimhan.com या वेबसाईटला भेट द्यावी किंवा 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनी विनायक निम्हण यांनी केले.





