मुंबई : उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदे यांनी शिंदेसेनेत प्रवेशाची तयारी केली असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही पदाधिकारी बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला देखील हजर होते. या दोघांच्या शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदेसेनेवर हल्लाबोल केला. काल झालेल्या बैठकीत २२ नगसेवकांनी सांगितले की, आम्हाला कशा प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत. शिंदेंचे काही दलाल बाजारात फिरत असून गिर्हाईक शोधत आहेत. दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि स्वतःचा पक्ष चालवायचा, असे काम सुरु आहे. त्यांनी आधीच ठरवलं असणार पण उद्धव ठाकरे काय बोलतात यासाठी ते बैठकीला आले असतील. आम्हाला कल्पना होती, ते दोघेही जाणार आहेत, असे विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत पुढे म्हणाले की, त्यांचा एक दलाल मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यात एक अधिकारी आहे. निमेश रेवडेकर असे त्याचे नाव आहे. हा बऱ्याच नगरसेवकांच्या घरी जातो. त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो. तुमच्या आयुष्याचे साहेब भले करणार आहेत, असे देखील सांगतो. शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षातला स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची हिंमत नाही, असा हल्लाबोल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. विकत घेतलेल्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवता येत नाही. सगळ्या माजी नगरसेवकांशी संवाद साधण्याचे काम उद्धव ठाकरे करतात. करोडो रुपयांचे आमिष उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. आमचे दलाल त्यांच्यासारखे बाजारात फिरत नाहीत. एक माजी नगरसेवक, एक विभाग प्रमुख भेटीला जात आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले.