Vinayak Raut : राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ! मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक
माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे.

Vinayak Raut : माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यरात्री एका भोंदू बाबासह दोन जणांना अटक केली आहे. या अटकेमुळे राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली असून, राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कुटुंबावर त्यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता पोलीस कारवाईला वेग आला आहे. विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्री एका भोंदू बाबासह दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
भोंदू बाबाला कुडाळमधून उचलले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या भोंदू बाबाचे नाव फिरोज शेख असे आहे. कापूरबावडी पोलिसांनी अत्यंत गोपनीय मोहीम आखत मध्यरात्री या भोंदू बाबाला सिंधुदुर्गातील कुडाळ येथून ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल असून, पोलीस इतर आरोपींचाही कसून शोध घेत आहेत.
राऊत कुटुंबाकडून सहकार्य नाही
दरम्यान, या तपासादरम्यान पोलिसांनी विनायक राऊत (Vinayak Raut) आणि त्यांच्या कुटुंबाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही नोटीस किंवा संपर्काला राऊत कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.
सुनेचे अत्यंत धक्कादायक आरोप
विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलताना राऊत कुटुंबावर अत्यंत गंभीर आणि अघोरी छळ केल्याचे आरोप केले आहेत. मला वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता. मासाचे तुकडे अंगावरून उतवरत होते. तांब्याची तार उतरवत होते.
कोण कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्तीची उदी तीर्थ पेलाभरून द्यायचे. गोमूत्र द्यायचे. मुलाचं शारिरीक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बरबाद केलं आहे असे गिरिजा राऊत म्हणाल्या आहेत.
विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले
हे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आणि कुटुंबावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित किंवा खोटे असल्याचे त्यांनी सूचित केले असले, तरी त्यांची सून गिरिजा आपल्या आरोपांवर ठाम आहे.
पोलिसांनी या प्रकरणात ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ आणि कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी सुरू केली आहे. भोंदू बाबाच्या अटकेनंतर आता राऊत कुटुंबातील सदस्यांवर अटकेची टांगती तलवार असून, पोलीस या प्रकरणात आणखी काही जणांना लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






