Maharashtra Assembly Election 2024 : विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश

पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुढील महिन्यात राज्यात निवडणूका पार पडणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यादरम्यान शिवसंग्रामचे प्रमुख स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती विनायक मेटे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे या सांभाळत होत्या. मात्र अचानक ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आले आहे. ज्योती मेटे यांच्या सह सलीम पटेल बाळासाहेब खोसे यांनीदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते.
बीडमधून निवडणूक लढवणार?
दोन तीन दिवसापूर्वी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





