विनायक मेटे यांच्या मुलाने आत्याविरोधात केली तक्रार दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे – स्व. माजी आमदार विनायक मेटे यांची विमाननगर येथील सदनिका सख्खी बहिण आणि तिच्या मुलाने बळकावली असल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी मेटे यांचा मुलगा आशुतोष विनायक मेटे (२०,रा.कोरेगाव पार्क) याने तक्रार दिली आहे.
त्याने दिलेल्या तक्रारीनूसार, मेटे यांची बहिण आणि भाच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विमाननगर येथील गंगापूर हौसिंग सोसायटीमध्ये मेटे यांची सदनिका होती. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ठाणे येथील बहिणीने आणि भाच्याने सदनिकेचा ताबा घेतला. सदनिकेचे लॅच लॉक तोडून त्यांनी ती ताब्यात घेतली. ही सदनिका मेटे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांचा मुलगा शिक्षणानिमित्त कोरेगाव पार्क येथे रहातो. सध्या याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे करत आहेत.
दरम्यान, विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक होते. त्यांचे ऑगस्ट २०२२ मध्ये अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रसायणी येथे बोगद्याच्या अगोदर त्यांची मोटार समोरील अवजड वाहनाला धडकली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला होता.





