Viman Nagar Spa Raid – स्पा सेंटरवरील पोलीस छाप्यावेळी गॅलरीतून उडी मारलेल्या महिलेचा ससूनमध्ये उपचारावेळी मृत्यू झाल्याने राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. स्पा सेंटरच्या नावे सुरू इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर विमानतळ पोलिसांनी सोमवारी (दि.२३) छापा टाकला होता. सीआयडी पथकाने मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून, चौकशीची मागणी केली आहे. तक्रार अर्जात त्याने म्हटले आहे, की घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी करावी. घटनास्थळी उपस्थित अधिकारी, पोलीस, व्यक्तींचे जबाब नोंदवावेत. छाप्यावेळी महिलेबरोबर स्पा मॅनेजर हुसेन शेख यानेगी उडी मारल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना विमानतळ परिसरातील सिटी स्पेस बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील द रुटस स्पा येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली होती. वेश्या व्यवसायाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, महिला अंमलदार, पंचांसमक्ष वर कारवाई करण्यासाठी सिटी स्पेसमध्ये दाखल झाले. स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिल्यानंतर दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेथे चार पीडित महिला, चार पुरुष आढळले. यावेळी एका केबिनचा दरवाजा बंद दिसला. हाही दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी आतील महिलेने दोघेजण गॅलरीमार्गे खाली उतरत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी पाहिले तेव्हा, दोघेजण खाली पडल्याचे दिसून आले. त्यात एक महिला, एक पुरुष होता. पोलिसांनी त्यांना सरकारी गाडीतून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दोघांना ससूनमध्ये दाखल केले. मात्र, महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.