nagar | जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

निघोज (वार्ताहर) – निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन व पत्रकार संघ, तसेच विविध सामाजिक संघटना यांनी निषेध केला. गुरुवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला.
दोन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल. सराईत गुन्हेगार धोंड्या जाधव याला तसेच त्याच्या गुन्हेगार साथीदारांना मोक्का लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
दि . ९ जुलै रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मोक्का ठराव घेण्यात येणार असून, पारनेर व नगर पोलिसांनी यामध्ये हलगर्जीपणा केल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
निघोज आणि परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये मटका, जुगार, अवैध दारू हे दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, निघोज, पारनेर, नगर पोलीस खात्याला या धंद्याची परिपूर्ण माहिती असूनही ते डोळेझाक करतात.
हे धंदे बंद न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार आहे, याची माहिती पुणे व नगर पोलिसांना माहिती आहे. मात्र, स्थानिक पोलीस मात्र अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात. या हल्ल्याचा निषेध करून ग्रामस्थांनी गावातून मूक मोर्चा काढला.
मळगंगा मंदिरासमोरील जाहीर निषेध सभेत पोलिसांना निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण,
माजी उपसभापती खंडू भुकन, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शशिकला भुकन, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेव थोरात अनिल शेटे, चंद्रकांत लामखडे, अमृताशेठ रसाळ, बबुशा वरखडे,
रामदास वरखडे, प्रा ज्ञानेश्वर कवाद, अंकुश लोखंडे, वसंत ढवण, बाळासाहेब रसाळ, योगेश वाव्हळ, महेश लोळगे, मयूर गुगळे, सोनीताई पवार, आनंद भुकन व योगेश खाडे, रवि रणसिंग आदी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





