Pune Gramin : बिबट्याच्या हल्ल्यानंतर ग्रामस्थांचा रोष उफाळला; वनविभागाचे वाहन अन् कार्यालयही पेटवले

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे तेरा वर्षांच्या रोहन विलास बोंबे या मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत शिरूर-मंचर अष्टविनायक महामार्ग तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील रोडेवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. चारही बाजूंनी रस्ता अडवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गेल्या पंधरवड्यातील ही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेली तिसरी घटना असल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. दरवेळी बिबट्याचा बळी गेल्यानंतर वनविभाग केवळ औपचारिकता पूर्ण करतो; ठोस उपाययोजना मात्र होत नाहीत, अशा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. संतप्त जमावाने पिंपरखेड येथील वनविभागाचे बेस कॅम्प तसेच वाहन पेटवून दिले, तर कार्यालयात तोडफोड केली.
घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिरूर, पारगाव, रांजणगाव पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले की, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सतर्क आहे.
या आंदोलनात शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम, दामूआण्णा घोडे, शिवसेना अध्यक्ष सुरेश भोर, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे, तसेच विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या पिंपरखेड परिसरात तणावपूर्ण शांतता असून, ग्रामस्थ भयभीत आणि संतप्त दिसत आहेत. भीतीच्या वातावरणामुळे वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येण्याचे टाळत असल्याचे समजते.
आंदोलन मागे घेणार नाही
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जिल्हाधिकारी आणि वनमंत्री घटनास्थळी येऊन ठोस निर्णय घेईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. एअरकंडिशन ऑफिसमध्ये बसून शेतकर्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या वेदना न समजणार्या अधिकार्यांना आता मैदानात उतरावे लागेल, असे देवदत्त निकम आणि माऊली ढोमे यांनी संतापपूर्वक सांगितले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आंबेगाव आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवरील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात बारा वर्षीय रोहन विलास बोंबे या निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटा येथे रविवार रात्री अष्टविनायक व बेल्हा-जेजुरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
शिरूर, मंचर, ओतूर, नारायणगाव, शिक्रापूर आणि आळेफाटा पोलीस ठाण्यातील जवळपास 150 पोलीस, चार पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक तसेच दोन डीवायएसपी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असला तरी ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
रस्त्यावर बसलेल्या नागरिकांच्या घोषणाबाजीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस प्रशासन सतत परिसरावर लक्ष ठेवून कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून सतर्क आहे. या घटनेमुळे बिबट्याच्या हल्ल्यांविषयी नागरिकांचा रोष आणखी तीव्र झाला आहे.
“आमच्या लेकरांचा जीव जातोय आणि वन खातं फक्त पाहतंय. आता आम्ही शांत बसणार नाही, बिबट्यांना पकडा नाहीतर यापुढे अजूनही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
-देवदत्त निकम, अध्यक्ष, पुणे जिल्हा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष





