Vilas Shinde : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! विलास शिंदे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे : नाशिक जिल्ह्यातील उद्धवसेनेला माजी महानगरप्रमुख असणार्या विलास शिंदे यांनी अखेर रामराम ठोकला. विलास शिंदे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा उद्धवसेनेसाठी एकाच महिण्यातील दुसरा धक्का आहे. या महिण्यात सुधाकर बडगुजरांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता विलास शिंदे यांनी शिंदेसेनेत प्रवेश घेतला असल्याने उद्धवसेनेला नाशकात मोठे भगदाड पडले आहे.
विलास शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसहित प्रवेश करताना आपली ताकद दाखवून दिली. प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जोरादार बॆटिंग केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदेंना उद्देशून, तिकडे काही शिल्लक ठेवले आहेस ? अशी विचारणा केली व हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी असल्याचा टोला उद्धवसेनेला लगावला.
गेल्या अनेक महिण्यांपासून विलास शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. साधारण महिनाभरापुर्वी विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. त्यानंतर विलास शिंदे हे शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी विलास शिंदेंनी या गोष्टीचा इन्कार केला होता. मात्र काहीच दिवसांमध्ये विलास शिंदेंनी आपली भूमीका बदलताना, शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.
नाशिकमध्ये भगवा फडकेल…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर विलास शिंदे यांचा प्रवेश शिंदेसेनेसाठी फायदेशीर ठरु शकतो. विलास शिंदे यांनी ७ माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह प्रवेश केल्याने शिंदेसेनेच्या ताकदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल, अशी खात्री वाटत असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या पक्षप्रवेशावेळी मंत्री दादा भूसे, खा. नरेश म्हस्के आदी शिंदेसेनेचे नेते उपस्थित होते.





