निळवंडेच्या वादाचे मुद्दे निळवंडे कालव्याच्या पाण्याबरोबर सोडून द्यावे – विखे पाटलांची थोरातांना सूचना

अकोले (प्रतिनिधी) – पुण्याचे काम होण्यासाठी खरच भाग्य लागते. तुमच्या काळात काम झाले नाही यात आमचा दोष नाही आमच्या काळात काम पुर्ण होते हे भाग्य आहे आता टीका टिपण्णी करण्यापेक्षा निळवंडेच्या वादाचे मुद्दे निळवंडे कालव्याच्या पाण्याबरोबर सोडून द्यावे अशी सुचना आमदार बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ३१ मे २०२३ रोजी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निळवंडे कालव्याला पाणी सोडून (टेस्टींग) चाचणी केली जाणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज निळवंडे धरण व कालव्याच्या कामाला भेट देवून कामाची पाहणी केली यावेळी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, मा.आ. वैभवराव पिचड, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचाैरे, राजेंद्र डावरे, विकास वाकचाैरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे सह धरणग्रस्त भागातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पत्रकाराशी बोलताना विखे म्हणाले की, उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला निळवंडे कालव्याने पाणी मिळण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. लवकरच ३१ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कालव्याला पाणी सोडण्याच्या चाचणीचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी कालव्यामधील जागोजागी बनवलेली पुल, भराव टाकलेल्या ठिकणाची टेस्टींग (चाचणी) पाणी सोडून केली जाणार आहे. निळवंडेच्या कामाला त्या त्या सरकारच्या काळात ती ती कामे झालीत आज आपल्या सरकारच्या काळात कॅनॅालसह काम पुर्णत्वास जात आहे याचा आनंद आहे. आरोप होत राहणार त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आता काम पुर्णत्वास गेले जनतेला पाणी देणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. निळवंडेच्या वादाबाबतचे सर्व विषय आत कॅनॅालच्या पाण्या बरोबर सोडून देवून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी एकत्रित सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
.





