मुंबई : दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का? असे वक्तव्य करून गोत्यात आलेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठताच आज सपशेल माफी मागितली. मात्र, माझे वक्तव्य तोडून-मोडून दाखवल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांवरच केला. अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर देशात काहीतरी वेगळे वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम काही ठराविक माध्यमे करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. माझे भाषण पूर्ण दाखवा. अर्धवट दाखवू नका. सरकारचे अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अतिरेक्यांनी पहिल्यांदाच धर्म विचारला आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला यामध्ये त्यांना शिकवून पाठवले गेले आहे. देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचा हे काम पाकिस्तानचे होते, असे माझे मत असल्याचे माफीनंतर वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.