Vijay Wadettiwar : राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवणे हाच उपाय; विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले मत

नागपूर : आरक्षणासंबंधी राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेचाच विचार करावा लागणार आहे. भाजप नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे असे काहीही निर्णय घेतले जात आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले आहे की, आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. अनेक राज्यांनी आरक्षणाची कॅप वाढवून घेतली आहे. यामुळे राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढवणे हाच उपाय आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, निवडणूक आली की आरक्षण आंदोलन पेटवणे आणि निर्णय घेणे हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे काम झाले आहे. ज्या पक्षाचा मुळातून आरक्षणाला विरोध आहे ते कोणाचे भले करणार आहे. त्यांच्या मातृसंस्थेने आरक्षणासंबंधी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाने एकत्रित उत्तर घ्यायला पाहिजे होते.
याआधी शिंदे समितीला 58 लाख दाखले सापडले होते. त्यातील 96 हजारांना जात प्रमाणपत्र दिले, त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. मराठा आणि कुणबी या जाती एक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हैदारबाद गॅझेटच्या संदर्भाने हा जीआर काढला आहे. कॅबिनटेसमोर हा जीआर जाईल त्यानंतर अंतिम मसुदा काय येतो हे पाहावे लागेल.
दोन्ही समाजांची मते मिळवण्यसाठी दोघांनाही धुर्तपणे खेळवत ठेवण्यासाटी भाजपने हा ‘जीआर’ काढला आहे. त्यामुळे यावर आताच काही बोलणे घाईचे होईल. आम्ही या निर्णयाचा अभ्यास करत आहोत. काँग्रेसच्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची बैठक 6 तारखेला बोलावण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 8 तारखेला मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ओबीसींचे काय नुकसान होणार आहे, यावर चर्चा केली जाणार आहे.





