Vijay Wadettiwar : त्यांनी 2 वेळा पंढरीची वारी करावी; विजय वडेट्टीवार यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला

मुंबई : चंद्रशखेर बावनकुळे यांनी आता स्वत:ची चिंता करावी, कारण दोन बंधू एकत्र आल्यानंतर आता त्यांना चिंता पडली आहे. त्यामुळे त्यांनी दोन वेळा पंढरीची वारी करावी. शिवाय आम्ही का गेलो नाही, हे आम्ही आमचं ठरवू त्यांनी यात पडू नये, अशी टीकात्मक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत शनिवारी मुंबईत विजयी मेळावा घेतला.
या ग्रँड सोहळ्यानंतर आता राजकीय वर्तुळातून तसेच खासकरून महायुतीमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, आमदार संजय गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झाला. माझ्यासारखा नेता सुद्धा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तयार झाला. मी आता काँग्रेसमध्ये असलो तरी बाळासाहेबांच्या नेतृत्वात तयार झालो आहे.
बाळासाहेबांनी कधी जात-पात, धर्म-पंथ मानला नाही. आता दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना इतका पोटशूळ आणि वेदना का होत आहेत ते समजत नाही? महापुरुषांचा अपमान करणा-यांची अवलाद आता निर्माण व्हायला लागली आहे. हीच जनता महापुरुषांचा अवमान करणा-या अवलादीचा सुपडा साफ करेल, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा
विठ्ठल हा जो त्याच्या चरणाशी जाईल त्याचा आहे, वारी ही संतांची परंपरा आहे. संत हे नेहमी मानवतेचे काम करणारे आहेत. वारी ही संतांनी सुरू केलेली आहे आणि ही एकतेची वारी आहे. महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा आणि एकोप्याने समाजाचा उद्धार व्हावा, यासाठी वारी आहे. जात-पात, धर्म-पंथ विसरून दुरावा संपुष्टात आणून विठोबाच्या चरणी लीन होऊन पंढरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत. आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस, अशी प्रार्थना विजय वडेट्टीवार यांनी विठ्ठल चरणी केली आहे.





