Vijay Thalapathy : विजय थलपतीची आगामी निवडणुकीसाठी मोठी घोषणा; तामिळनाडूत राजकीय भूकंपाची नांदी

चेन्नई : तामिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार विजय थलपती यांनी 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा करत राजकीय रणसंग्रामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील तमिलगा वेट्ट्री कझगम (TVK) पक्ष स्वबळावर सर्व 234 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कझगम (DMK) आणि भाजप यांच्याशी कोणतीही युती करणार नाही, असे विजय यांनी ठामपणे जाहीर केले. 21 ऑगस्ट रोजी मदुराई येथे झालेल्या TVK च्या दुसऱ्या राज्य परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त करत तामिळनाडूच्या राजकारणात नव्या बदलाची नांदी वाजवली आहे.
सिंहासारखा स्वाभिमानी लढा
मदुराईच्या या भव्य परिषदेत लाखो समर्थक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत विजय यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. “सिंह जेव्हा शिकारीसाठी बाहेर पडतो, तेव्हा तो सडलेलं मांस खात नाही. तो स्वतःची सीमारेषा ठरवतो.
त्याचप्रमाणे TVK स्वबळावर लढेल आणि जनतेच्या शक्तीवर सत्ता मिळवेल,” असे स्फूर्तिदायी उद्गार त्यांनी काढले. विजय यांनी 1967 आणि 1977 मध्ये तामिळनाडूत घडलेल्या राजकीय क्रांतीचा उल्लेख करत, 2026 मध्येही असाच ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
DMK आणि भाजपवर घणाघाती टीका
विजय यांनी DMK ला “राजकीय शत्रू” आणि भाजपला “वैचारिक शत्रू” संबोधत जोरदार हल्ला चढवला. “DMK ने भ्रष्टाचार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुप्त युती करून तामिळ जनतेचा विश्वासघात केला आहे. तर भाजपची तामिळनाडूविरोधी धोरणे आणि NEET सारख्या मुद्द्यांमुळे तामिळ तरुणांचे भविष्य धोक्यात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
TVK कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही पक्षांशी युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “आमचा आवाज हा तामिळ जनतेचा आवाज आहे, आणि कोणीही तो दाबू शकत नाही,” असे विजय यांनी ठणकावले.





