Vijay Shah : कसली माफी? ती काय माफी आहे?; सर्वोच्च न्यायालयाने विजय शहा यांना सुनावलं

नवी दिल्ली : तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्ही बोलताना तुमच्या शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. ही कसली माफी? ती काय माफी आहे? कधीकधी लोक कायदेशीर दायित्वांपासून पळ काढण्यासाठी माफी मागतात. तुम्ही केलेले विधान पूर्णपणे अविचारी आहे. देशाला तुमची लाज वाटते, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना फटकारले. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
ही सुनावणी न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर पार पडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मध्य प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील विजय शहा यांना फटकारले आहे. तसेच त्यांचा माफीनामा स्वीकारण्यासही नकार दिला.
न्यायालयाचे म्हटले की, तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आहात. अनुभवी राजकीय नेते आहात. अशा वेळी तुम्ही बोलताना विचार करायला हवा. आपल्याला जबाबदारीचे भान हवे, तुम्ही नेमकी कशासाठी माफी मागितली याचे व्हिडिओ दाखवा. तुम्ही माफी कशी मागितली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काही लोक हातवारे करून माफी मागतात. तर, काही फक्त मगरीचे अश्रू ढाळतात. त्यामुळे तुम्ही माफी नेमकी कशी मागितली हे जाणून घ्यायचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
एसआयटीमध्ये कोण असणार?
भाजप मंत्री विजय शहा यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसाआयटी स्थापन करण्याचे आदेश मध्य-प्रदेश सरकारला दिले आहेत. या एसआयटीमध्ये मध्य प्रदेश कॅडरमधील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असावा. जे सध्या राज्यात सेवा देत आहेत परंतु मूळतः त्या अधिकाऱ्यांचे नाहीत. तसेच यात एक महिला अधिकाऱ्याचाही समावेश असेल, असे न्यायालयाने म्हटले. याशिवाय मंगळवारी (दि.२०) सकाळी १० वाजेपर्यंत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देऊन एसआयटीने २८ मे पर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.





