Vijay Shah : विजय शहांविरूध्द एफआयआर दाखल करा; उच्च न्यायालयाचे मध्य प्रदेश सरकारला आदेश

भोपाळ : ऑपरेशन सिंदूरमधील नायिका सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पण्यांच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि त्यावर सुनावणी केली. मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहार मंत्री विजय शहा यांच्याविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिले. राज्याच्या वतीने महाधिवक्ता प्रशांत सिंह न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठासमोर हजर झाले.
न्यायालयाने सहा तासांत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही उद्या न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचे नाव न घेता त्यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटल्यानंतर काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी दबाव आणला जात आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विजय शाह यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आणि अशी बेजबाबदार विधाने थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्याची मागणी केली आहे. जर शाह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले नाही तर पक्ष राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की भाजप हिंदू-मुस्लिम मुद्द्यांमध्ये गुंतवून जनतेची दिशाभूल करत आहे.
पटवारी यांनी पत्रात मंत्री विजय शहा यांच्या विधानाचा उल्लेख करून ते देशविरोधी विधान असल्याचे म्हटले आहे आणि ते भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठेवर, देशाच्या एकतेवर आणि सामाजिक सौहार्दावर उघड हल्ला असल्याचे म्हटले आहे. हे संकुचित विचारसरणीचे, सांप्रदायिक द्वेषाचे आणि बेजबाबदार वृत्तीचे उदाहरण आहे, जे त्यांना लोकप्रतिनिधी पदासाठी, विशेषतः मंत्रीपदासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचे सिद्ध करते.
मोहन यादव यांचे मौन धक्कादायक
कर्नल सोफिया कुरेशी यांनी देशाचा अभिमान वाढवला आहे. अशा व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे हे त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा, भारतीय सैन्याचा आणि जनभावनांचाही अपमान आहे. या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे मौन देखील धक्कादायक आहे आणि नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित करते.





