Vijay Hazare Trophy 2021 : पृथ्वी शॉची विक्रमी खेळी

नवी दिल्ली – मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ याने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळीचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्राचा नऊ गडी राखून पराभव करताना उपांत्य फेरी गाठली.
पृथ्वीने 123 चेंडूंत 185 धावा केल्या. अ श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना कुठल्याही भारतीयाने केलेली ही विक्रमी खेळी ठरली. यापूर्वी भारताकडून हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोहलीने 2012 साली पाकिस्तानविरुद्ध आशिया करंडक स्पर्धेत 183 धावांची खेळी करून धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
पृथ्वीने हा विक्रम मोडला. त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्राने 50 षटकांत 5 बाद 284 धावा केल्या होत्या. समर्थ व्यासने 7 चौकार आणि 4 षटकारांसह 71 चेंडूंत नाबाद 90 धावांची खेळी केली. त्याला चिराग जानी याने 38 चेंडूंत नाबाद 53 धावांची खेळी करून सुरेख साथ केली. त्यापूर्वी विश्वराज जडेजा याने 53 धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व यशस्वी जयस्वाल यांनी 238 धावांची सलामी देत मुंबईचा विजय निश्चित केला. कर्णधार श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांना विश्रांती दिल्याने त्यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या सलामीमुळे या दोघांची उणीव भासली नाही. यशस्वीने 104 चेंडूंत 75 धावा केल्या. पृथ्वीने आपल्या विक्रमी खेळीत 21 चौकार व 7 षटकार फटकावले.
सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने 35 व्या षटकांत यशस्वीला बाद केले. त्यानंतर 42 व्या षटकांत पृथ्वीने आदित्य तरेच्या साथीत मुंबईचा विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक –सौराष्ट्र – 50 षटकांत 5 बाद 284 धावा. (समर्थ व्यास नाबाद 90, चिराग जानी 53, विश्वराज जडेजा 53, शम्स मुलाणी 2-51) पराभूत वि. मुंबई – 41.5 षटकांत 1 बाद 285 धावा. (पृथ्वी शॉ नाबाद 185, यशस्वी जैस्वाल 75.
पडीक्कलच्या कर्नाटकशी मुंबईची उपांत्य लढत
या स्पर्धेत मुंबईने जरी आक्रमक खेळाचे दर्शन घडवले असले तरी आता त्यांचा सामना देवदत्त पडीक्कलच्या बलाढ्य कर्नाटकशी गुरुवारी होत आहे. या स्पर्धेत पडीक्कलने कर्नाटकच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना अ श्रेणी क्रिकेटमध्ये सलग चार शतकी खेळी केल्या आहेत. त्यामुळे हा सामना पडीक्कलविरुद्ध पृथ्वी शॉ असा रंगणार आहे. पडीक्कलने या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात एकूण 673 धावा केल्या आहेत. तर, शॉ याने 589 धावा केल्या आहेत. त्यामुळे हा सामना याच दोघांच्या फलंदाजीवर निकाली ठरणार आहे.





