पिंपरी – चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघांमधून तब्बल 41 जणांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यापैकी पिंपरी या राखीव मतदार संघातून सर्वाधिक 18 उमेदवार जनतेचा कौल आजमावणार आहेत. पिंपरी व भोसरी विधानसभा मतदार संघातील बंडोबांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. चिंचवडमध्ये मात्र, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आपला अर्ज कायम ठेवत बंडाचा झेंडा रोवला आहे. तिन्ही मतदार संघात अपेक्षेप्रमाणे दुरंगी लढत होणार आहे. चिंचवड आणि भोसरी मतदार संघात गतवेळचेच प्रमुख प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. चिंचवड विधानसभेसाठी दुरंगी सामना रंगणार – चिंचवड विधानसभेसाठी कोणामध्ये लढत रंगणार या हे आज अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीचे उमेदवार तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले झाले ओह. आज एकुण तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 11 जण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी 11 उमेदवारांमध्ये लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी यावेळी 19 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी, शुक्रवार दि. 5 ऑक्टोबर रोजी छाननीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज भरलेले प्रशांत कृष्णराव शितोळे, शंकर पाडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनशाम परेदशी व प्रकाश भाऊराव घोडके या पाच जणांचे अर्ज बाद झाले होते. तर आज सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी कैलास दशरथ परदेशी, जावेद रशीद शेख व धर्मपाल यशवंत तंतरपाळे या तिघांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे, आता चिंचवडच्या आखाड्यामध्ये 11 जणांमध्ये लढत होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा जगताप आणि भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. मतदारसंघात हिंदुत्त्ववादी मतदारांची मोठी संख्या असल्याने जगताप हे सहज विजयी होतील, असे बोलले जात होते. मात्र शिवसेनेचेच नगरसेवक आणि गटनेते असलेल्या राहूल कलाटे यांनी अपक्ष म्हणून मैदानात शड्डु ठोकल्याने चिंचवडमधील निवडणूक जगताप यांना तितकी सोपी राहिली नाही. कलाटे हे जगतापांना तगडी लढत देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यांच्यामध्ये होणार लढत – लक्ष्मण पांडूरंग जगताप, सुरज अशोकराव खंदारे, नितीश दगडू लोखंडे, डॉ. मिलींदराजे दिंगबर भोसले, महावीर उर्फ अजित प्रकाश संचेती, राजेंद्र मारुती काटे, राजेंद्र माणिक लोंढे, एकनाथ नामदेव जगताप, रविंद्र विनायक पारधे, छायावती चंद्रकांत देसले हे उमेदवार नशीब अजमावित असून मतदारसंघात यंदा चांगलीच लढत रंगणार आहे.