इचलकरंजी : राज्यात सध्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यंदाची निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये साताऱ्यात शरद पवारांनी भरपावसात भाषण करून सभा गाजवली होती. या सभेमुळे त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. 2019 ची पुनरावृत्ती होणार ? त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले आहेत. इचलकरंजीमध्ये शरद पवारांची सभा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली, यानंतरही त्यांनी भाषण सुरू ठेवलं. शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजल्यामुळे निवडणुकीचं वारं फिरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 2019 मध्ये काय घडले? 2019 मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली. त्यामध्ये भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली होती. या सभेमध्ये जोरदार पाऊस झाला तरी शरद पवारांनी भर पावसात भाषण केले. या भाषणाचा त्यांना खूप फायदा झाला. या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला. तसेच शरद पवारांचे 54 आमदार त्या निवडणुकीत निवडून आले. आजदेखील शरद पवारांनी पावसात भाषण केले. त्यामुळे याचा शरद पवारांना कितपत फायदा होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.